- कपाशीच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना केल्या.
पहाटेपासूनच दुकानासमोर रांगेत उभे राहून कपाशी बियाण्याचे दोन पाकीट पदरी
देशोन्नती वृत्तसंकलन
अकोला (Akola) : कपाशीच्या पसंतीच्या बियांण्यासाठी शेतकऱ्यांचा हंगामपूर्व संघर्ष सुरू आहे. अकोल्याच्या विक्रमी तापमानात तासन् तास रांगेत उभे राहूनही मागणीप्रमाणे आवश्यक असलेले कपाशी बियाणे (Cotton seed) मिळत नसल्याने मंगळवारी टिळक मार्गावर ( Tilak Road ) नाईलाजाने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांना घेराव घालत संतप्त शेतकऱ्यांनी जाब विचारला. यावेळी शेतकऱ्यांचे मात्र अधिकारी समाधान करू शकत नसल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी खरीप हंगाम ( Kharif season ) बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येऊन ठेपला आहे. जूनमध्ये पेरणीलायक पाऊस झाल्यावर शेतात पेरणीची लगबग सुरू होणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे शेतकरी बियाणे खरेदीसाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र पसंतीच्या कपाशी बियाण्यांची टंचाई शेतकऱ्यांना भेडसावत आहे. विशेषतः कोरडवाहू शेती क्षेत्रातील शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पादन देणाऱ्या पसंतीचे कपाशी बियाणे मागणीनुसार मिळत नसल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यात शेतकऱ्यांची मागणी असलेल्या पसंतीच्या कपाशी बियाण्यांची टंचाई शेतकऱ्यांची झोप उडवणारी ठरत आहे. रात्री कधी पहाटेपासूनच दुकानासमोर रांगेत उभे राहून कपाशी बियाण्याचे दोन पाकीट पदरी येत आहेत. या दोन पाकीट बियाण्यात पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्याना भेडसावत आहे. मंगळवारी शहरातील बियाणे विक्री करणाऱ्या दुकानासमोर शेतकऱ्यांनी त्यांच्या मागणीकरिता स्थानिक टिळक रोडवर रास्ता रोको केला यावेळी पोलिसही ( Police ) घटनास्थळी दाखल झाले होते. शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी, ( Agriculture Officer, ) कर्मचारी यांना घेराव घालत त्यांना जाब विचारला. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पसंतीच्या बियाण्यांसाठीचा हा संघर्ष कुठवर सुरू राहील, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
> अधिकाऱ्यांना घेराव, शेतकऱ्यांनी विचारला जाब,कपाशी बियाण्यांची जादा दराने विक्री !
शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या कपाशी बियाण्यांचे फक्त दोन पाकीट मिळत आहेत. त्यासाठी तासन् तास रांगेत ताठकळत राहावे लागत आहे. एकीकडे बियाण्यांची टंचाई असल्याचे अधिकारी सांगत असताना दुसरीकडे जादा दराने हेच पसंतीचे बियाणे विक्री होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी बोलताना केला. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली. शेतकऱ्यांची ही लूट थांबणार तरी कधी असे प्रतीप्रश्नदेखील देखील संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केले.
- कपाशी बियाणे टंचाईवर शेतकरी संतप्त जि.प. सभेत झाली होती बियाणे टंचाईवर खडाजंगी
जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कपाशीच्या पसंतीच्या बियाण्यांचा तुटवडा का, कृषी अधिकाऱ्यानी संबंधित कंपनीकडे किती मागणी केली, पुरवठा किती करण्यात आला, असे प्रश्न जिप सर्वसाधारण सभेत सदस्यांनी उपस्थित केले होते. या प्रश्नांवर कृषी अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देत कपाशीच्या पसंतीच्या बियाण्यांबाबत मागणी नुसार संबंधित कंपनी पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले होते. ज्या ठिकाणी जिल्ह्यात मागणी कमी असेल त्या जिल्ह्यातील कपाशी बियाण्यांचा पुरवठा अकोला जिल्ह्यासाठी वळता करण्याचे प्रयत्न व्हावे, अशी मागणी काही जि. प. सदस्यांची या सभेत केली होती.
- शेतकऱ्यांचा आवाज शासनाकर्त्यापर्यंत जाईल काय
खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना कपाशी बियाणे टंचाईला सामोरे जावे लागत आहे, ही बाब शेतकऱ्यांसाठी मुस्कटदाबी ठरणारी आहे. बियाण्यांची फक्त दोन पाकीट देऊन तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार शेतकऱ्यांसोबत घडत असल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहे. शेतकऱ्यांचे हे विदारक वास्तव शासनकर्त्यांपर्यंत पोहचून कपाशीचे पसंतीचे मागणीनुसार बियाणे तातडीने उपलब्ध होईल काय, असा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित ठरत असल्याचे दिसत आहे. वर्षभर अकोल्याच्या विक्रमी तापमानात तासन् तास रांगेत उभे राहूनही मागणीप्रमाणे आवश्यक असलेले कपाशी बियाणे मिळत नसल्याने मंगळवा टिळक मार्गावर नाईलाजाने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलन केले.