अकोला (Akola Crime) : वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारी आता नवी शक्कल लढवत असून, हत्यारे नव्हे तर चक्क ‘बॉम्ब’व्दारे प्राण्यांना ठार केले जात असल्याचे समोर आले आहे. घातक तितकेच स्फोटक असलेल्या रसायनाचे गोळे अर्थात ‘बॉम्ब’ तयार करत वन्यप्राण्यांना जीवानिशी मारले जात असून, जिल्ह्यात या शिकार्यांची टोळी सक्रिय असल्याचे एका जागरूक मानद वन्यजीव रक्षक यांनी अकोला वन विभागासह पोलिस यंत्रणेला पुराव्यानिशी अवगत केले. ‘बॉम्ब’व्दारे वन्यप्राण्यांना ठार मारून त्या जनावरांच्या मांसाची विक्री करण्यात येत असल्याची (Akola Crime) धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
हे प्रकरण अकोला पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्यांनी गांभीर्याने घेतल्याने आता बोरगाव मंजू पोलिसांनी मानद वन्यजीव रक्षक यांना भ्रमणध्वनी करून कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे बोरगाव मंजू पोलिस सदर प्रकरण किती गांभीर्याने घेऊन कारवाई करतात याकडे अकोला जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बोरगाव मंजू ते विझोरा-सोनाळा रोडलगतच्या जंगलात हा (Akola Crime) प्रकार घडला असून, मानद वन्यजीव रक्षकांनी समोर आणला.
जंगल सफारी करताना त्यांना शिकारी जंगलात फिरताना आढळले. त्यांना शिकार्यांच्या हातात साहित्याने भरलेली पिशवी दिसली. यावेळी त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. या पिशवीत काय आहे, असा शिकार्यांना प्रश्न केल्यानंतर त्यांच्याकडून लपवालपवी होत असल्याचे निदर्शनास आले. परंतु, वन्यजीव रक्षकांनी मोठ्या धाडसाने त्यांच्याकडील पिशवी हडपली. पिशवी उघडल्यानंतर त्यात रसायनाचे १० ते १२ गोळे दिसले. हे (Akola Crime) गोळे बॉम्बच असल्याचे समोर येताच घाबरलेल्या शिकार्यांनी तेथून पळ काढला.
‘बॉम्ब’ प्रयोगशाळेत पाठवा
वन्यजीव रक्षकांनी खात्री करण्यासाठी ‘बॉम्ब’ प्रयोगशाळेत पाठवा, हे बॉम्बच असल्याचे ठणकावून सांगत याबाबत आर्म अॅक्टनुसार (Akola Crime) गुन्हा दाखल होतो, असेही सांगितले. मानद वन्यजीव रक्षकांनी वनविभागाला तत्काळ अवगत केले. आरएफओ, वनपाल यांना पाचारण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न केल्यानंतर वनपाल हजर झाले. परंतु, हे ‘बॉम्ब’ असण्यावर त्यांनी शंका उपस्थित करून वेळ मारून नेल्याचे बोलल्या जात आहे.
पोलिसांकडून कारवाई करण्याचे आश्वासन!
बोरगाव मंजू पोलिसांनी मानद वन्यजीव रक्षक यांना भ्रमणध्वनी करून कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे बोरगाव मंजू पोलिस सदर प्रकरण किती गांभीर्याने घेऊन कारवाई करतात याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कारवाईचे अधिकार पोलिस यंत्रणेला
बॉम्बव्दारे वन्यप्राण्यांना ठार करणारे कथित प्रकरण वनविभागाच्या अखत्यारीतील असून, त्यानुसार घटनेचा पंचनामा केला आहे. परंतु, हे प्रकरण आर्म अॅक्टअंतर्गत येत असल्याने पोलिस विभागाकडून कारवाई अपेक्षित आहे. पंचनामा, जप्त केलेले बॉम्बसदृश साहित्य आम्ही पोलिसांच्या ताब्यात देत आहोत.
– थोरात, आरएफओ, अकोला