जिल्ह्यातील पांगरा, माना प्रकल्प कार्यान्वित
जिल्ह्यात 8 तर परिमंडळात 21 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती
अकोला (Akola) : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 (CM Solar Agricultural Channel Scheme 2.0) अंतर्गत राज्यात 16 हजार मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी 3 मेगावॅट क्षमता असलेला अकोला जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प (Solar Project) पातूर तालुक्यातील पांगरा आणि 2 मेगावॅट क्षमता असलेला तिसरा सौर प्रकल्प मुर्तीजापूर तालुक्यातील माना येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. या दोन प्रकल्पामुळे जिल्ह्यातील 1 हजार 24 शेतकऱ्यांना आता दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
नागपूर प्रादेशीक संचालक परेश भागवत (Nagpur Regional Director Paresh Bhagwat) यांच्या विशेष सहकार्याने आणि मुख्य अभियंता सुहास रंगारी यांच्या पुढाकारातून याअगोदर 5 ऑक्टोबरला जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील जलालाबाद येथील 3 मेगावॅट क्षमता असलेला सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्यामुळे 452 शेतकऱ्यांना (Farmer) आता दिवसा वीज मिळत आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पातूर तालुक्यातील पांगरा येथील सौर प्रकल्प हा 15 एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आला आहे. मेघा इंजिनिअरींगतर्फे (Megha Engineering) पूर्ण करण्यात आलेला हा प्रकल्प 33 केव्ही चान्नी उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे 33 केव्ही चान्नी उपकेंद्रातून निघणाऱ्या 11 केव्ही मळसुर आणि 11 केव्ही पिंपळखुटा या कृषी वीज वाहिनीवरील सावनी, मळसूर, गावनगाव, पहाडसिंगी, पांगरताटी, आडगाव, वहाडा या गावातील 540 आणि मुर्तीजापूर तालुक्यात 2 मेगावॅट क्षमता असलेला सौरप्रकल्प हा १० एकर सरकारी गायराण जमीनीवर उभारण्यात आला असून हा उपकेंद्रातून तयार होणारी वीज 33 केव्ही माना उपकेंद्रांद्वारे माना परिसरातील 484 शेतकऱ्यांना दिवसाला वीज मिळणार आहे.
अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज नियमित देण्यासाठी विविध ठिकाणी सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित येत आहेत. अकोला जिल्ह्यात बार्शिटाकळी तालुक्यातील जलालाबाद हा प्रकल्प पहिला ठरला असून, या प्रकल्पानंतर मूर्तिजापूर आणि पातूर तालुक्यातील दोन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील 1 हजारांवर शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी (Agricultural Pump) आता खात्रीशीर दिवसा वीज (Electricity) मिळणार आहे.
सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करायची व त्याच्या आधारे कृषीपंप चालवायचे अशी ही योजना आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी विकेंद्रित स्वरुपात सौरऊर्जा निर्मिती केंद्रे (Solar Power Generation Stations) उभारण्यात येत आहेत. जिल्ह्यात 204 मेगावॅट वीज निर्मितीसाठी 67 सौर प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होणार आहे. अगोदर 5 ऑक्टोबरला जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील जलालाबाद येथील 3 मेगावॅट क्षमता असलेला सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्यामुळे 452 शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळत आहे.
जलालाबाद, पांगरा, माना प्रकल्पातून 8 मेगावॅट सौर वीज!
आतपर्यंत अकोला जिल्ह्यात जलालाबाद 3 मेगावॅट, पांगरा 3 मेगावॅट आणि माना 2 मेगावॅट असे एकुण 8 मेगावॅट क्षमता असलेले तीन सौर ऊर्जा प्रकल्प आणि परिमंडळात एकुण 21 मेगावॅट चे सौर प्रकल्प सुरू झाले आहे. त्यामध्ये प्रत्येकी 4 मेगावॅट क्षमता असलेले वाशिम जिल्ह्यातील हिसई आणि उंबर्डा बाजार आणि बुलडाणा जिल्ह्यातील 5 मेगावॅट क्षमता असलेला पळशी येथील सौर प्रकल्पाचा समावेश आहे.




