जि.प.च्या बांधकाम विभागातील नवाच सावळागोंधळ चव्हाट्यावर
अकोला (Akola Zilla Parishad) : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचार्यांवर तब्बल १९ दिवसांनी प्रभार लादला असल्याने या विभागाचा नवाच सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. १२ फेबु्रवारीला काढलेले प्रभाराचे आदेश ३ मार्च रोजी बाहेर आले. त्यामुळे प्रभाराचे आदेश काढणार्या तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंत्यांच्या वादातीत कामकाजावर व्यक्त होणार्या संशयाला पुष्टी मिळत आहे. तर १९ दिवस आदेशाची अंमलबजावणी का झाली नाही? असा कळीचा मुद्दा उपस्थित होत आहे. दरम्यान, देशोन्नतीने ३ मार्चच्या अंकात ’परवाना नूतनीकरणात हेलपाटे; कंत्राटदार व वरिष्ठांत खडाजंगी’ अशा मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय.
तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंत्यांनी बांधकाम विभागातील पंजीकरण, नरेगा, पत्रव्यवहार सांभाळणार्या टेबलचा १२ फेब्रुवारी रोजी सहायक स्थापत्य अभियंता विश्वजीत सरोदे यांना प्रभार देण्यात येत असल्याचे आदेश काढले. या टेबलवर स्थापत्य अभियंता नंदकिशोर सावीकर कार्यरत होते. दरम्यान, यापूर्वी सरोदे यांच्याकडेच हा टेबल होता. मात्र, (Akola Zilla Parishad) तक्रारीवरुन त्यांचा प्रभार काढून तो सावीकर यांना देण्यात आला होता, हे येथे विशेष.
दरम्यान, कार्यकारी अभियंत्यांनी १४ फेबु्रवारी रोजी आपल्या पदाचा प्रभार सोडला असला तरी १६ फेबुवारीपर्यंत त्यांनी कार्यालय सोडले नाही. १७ फेब्रुवारीला ते ‘बॅक टू पॅव्हेलियन’ अर्थात अकोट येथे रुजू झाले. दरम्यान, सरोदे यांच्या प्रभाराचे १२ फेबु्रवारी रोजी काढलेल्या (Akola Zilla Parishad) आदेशाची त्यांच्याकडून तामील का झाली नाही? असा प्रश्न उभा केला जात आहे. देशोन्नतीने वृत्त प्रकाशित करताच आजपर्यंत गुलदस्त्यात असलेला तो आदेश अचानक बाहेर आला, हे येथे विशेष.
समाजकल्याण अधिकारीपदी समाधान वाघ
समाजकल्याण अधिकारी या पदाचा हरिनारायण परिहार यांनी प्रभार सोडल्यानंतर जातपडताळणी कार्यालयातील संशोधन अधिकारी मनोज मेरत यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला. परंतु, त्यांनी प्रभार सांभाळण्यात असमर्थता दर्शविली. दरम्यान, आज सोमवारी या (Akola Zilla Parishad) पदाचा प्रभार पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समाधान वाघ यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती आहे.