आरोपी साहाय्यक शिक्षक, शिक्षिकेवर गुन्हे दाखल
अकोला (Akola) : तेल्हारा येथील सेठ बन्सीधर प्राथमिक शाळेचे (Primary School) मुख्याध्यापक आशिष अग्रवाल हे सहाय्यक शिक्षकांसोबत (Assistant Teacher) शाळेतच मीटिंग घेत होते. यावेळी कोणतीही परवानगी न घेता सेठ बन्सीधर विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सारिका साळुंके व सेठ बन्सीधर शाळेचे सहाय्यक शिक्षक संजीव डाबेराव हे आतमध्ये आले. यावेळी सदर शिक्षिकेने मुख्याध्यापकावर चप्पल उगारीत अश्लील शिवीगाळ करीत त्यांना भविष्य खराब करण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुख्याध्यापकांनी 26 डिसेंबरला दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खोट्या केसमध्ये अडकविण्याची दिली धमकी!
स्थानिक सेठ बन्सीधर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक (Principal) आशिष राधेश्याम अग्रवाल हे सहाय्यक शिक्षक किशोर राजूसिंग जाधव, सुधाकर त्रंबक काळमेघ, वैभव महादेव देऊळकर, स्वप्निल सुरेश महाले, सतीश लक्ष्मण मानकर यांच्यासोबत 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजेदरम्यान शाळेच्या कार्यालयात काही शिक्षकांसमवेत शालेय विषयावर महत्त्वाची मीटिंग घेत होते. मीटिंग सुरू असताना सेठ बन्सीधर विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सारिका श्रीकृष्ण साळुंके उर्फ सारिका संजीव डाबेराव व सेठ बन्सीधर प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक संजीव नामदेव डाबेराव दोन्ही राहणार योगेश्वर कॉलनी तेल्हारा हे पूर्वपरवानगी न घेता त्यांनी बेकायदेशीररीत्या कार्यालयात शिरकाव केला. बिन कैफियतदार क्रमांक एक सारिका साळुंके यांनी उपस्थित असलेल्या सहाय्यक शिक्षकांना अश्लील व अशोभनीय भाषेत शिवीगाळ सुरू केली. फिर्यादी मुख्याध्यापक आशिष अग्रवाल यांना खोटी तक्रार देऊन तुमचं सर्व भविष्य खतम करण्याची धमकी दिली. तसेच पायातील चप्पल काढून मुख्याध्यापकावर उगारली. तसेच याच शाळेत सहाय्यक शिक्षक असलेले आरोपी संजीव डाबेराव याने फिर्यादीसह त्यांचे सोबतच्या सहाय्यक शिक्षकांना शिवीगाळ करून खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली.
या प्रकरणी मुख्याध्यापक आशिष अग्रवाल यांनी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये गुरूवार, 26 डिसेंबर रोजी रात्री 9.26 वाजेदरम्यान तक्रार दिली. यावरून नमूद दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 296, 351, (2), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गोपाल बुंदे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.