त्रैमासिक आढावा बैठकीत दिल्या सूचना
हिंगोली (HIV Test) : जिल्ह्यातील सर्व गरोदर स्त्रियांची पहिल्या तिमाहीत नोंदणी व एचआयव्हीसह (HIV Test) सर्व तपासण्या करून घ्याव्यात, अशा सूचना उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी दिल्या. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी नोडल अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठूळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, कामगार विभागाचे प्रतिनिधी एन. एस. भिसे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, नायब तहसीलदार एस. डी. बोथीकर, विहानच्या श्रीमती अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी, एचआयव्ही /टीबी पर्यवेक्षक रविंद्र घुगे, डापकुचे संजय पवार, आशिष पाटील, टीना कुंदनानी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही, (HIV Test) एड्स कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल सादर केला. हिंगोली जिल्ह्यात सन 2002 पासून आतापर्यंत एकूण 4 हजार 208 सामान्य गटातील रुग्णांची व 279 गरोदर स्त्रियांची नोंद झाली असून एकूण 3 हजार 863 रुग्णांची एआरटी केंद्रात नोंदणी झाली आहे. त्यापैकी 1946 रुग्णांना औषधोपचार सुरु आहेत. तसेच सन 2024-25 मध्ये एप्रिल ते जून, 2024 या तिमाहीत एकूण 10 हजार 610 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 28 एचआयव्ही संसर्गित आढळून आले आहेत. तर 9 हजार 002 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली होती.
त्यापैकी एक नवीन व दोन यापूर्वीच एचआयव्ही संसर्गित (HIV Test) रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. तसेच एचआयव्ही संसर्गित महिलांच्या 4 मुलांचे 18 महिन्यानंतरचे तपासणी अहवाल संसर्गित आढळून आले नाहीत, अशी माहिती दिली. तसेच त्यांनी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व देहविक्रय करणाऱ्या महिलांना इतर सामाजिक लाभाच्या बाल संगोपन, संजय गांधी निराधार योजना, राशन कार्ड, बस पास, घरकुल योजना, मतदान कार्ड, इत्यादी योजनांचा लाभ देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
एचआयव्ही बाधित इंडेक्स तपासणी विशेष अभियानात 597 जणांची तपासणी
एचआयव्ही (HIV Test) बाधित रुग्णांच्या जोडीदार, त्यांच्या कुटुंबातील मुले तसेच शारीरिक संबंध आलेल्या इतर संशयित व्यक्तीपर्यंत पोहोचून, त्यांची संमती घेऊन एचआयव्हीची तपासणी करण्याची विशेष इंडेक्स तपासणी मोहीम 15 एप्रिल ते 15 ऑक्टोबर, 2024 दरम्यान राबविण्यात आली. या अभियानात 1937 जणांना तपासणीबाबत कळविण्यात आले होते. त्यापैकी 597 जण तपासणीसाठी तयार झाले. यापैकी 14 जण बाधित आढळून आले असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी सांगितले.