उदगीर (Latur):- गाणगापूर येथील नदीच्या संगमात स्नानासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू (Death)झाला आहे. ॲड. महेश डोईजोडे व त्यांचे सख्खे भाऊ बाळासाहेब डोईजोडे हे त्यांच्या परिवारासह आणि मित्रासह गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री एका लॉजमध्ये मुक्काम करून सकाळी पवित्र स्नानासाठी गेलेल्या दोघा भावांवर काळाने घाला घातला आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर, त्यांचे मित्र कैलास पाटील हेही पोटात पाणी गेल्याने गंभीर जखमी(seriously injured) आहेत. सदरील दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली असून उदगीर परिसरात शोककळा पसरली आहे.
मित्र थोडक्यात बचावला..
सविस्तर वृत्त असे की, सध्या मुंबई येथे राहत असलेले सिने दिग्दर्शक व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. महेश डोईजोडे यांनी आपल्या मित्रांना व कुटुंबियांसह मुंबईहून गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. महेश यांनी उदगीर येथे राहत असलेले त्यांचे भाऊ बाळासाहेब डोईजोडे यांनाही उदगीरहून कुटुंबियांसह गाणगापूरला येण्यासाठी सांगितले होते. ठरल्याप्रमाणे सर्वजण गाणगापूरला पोहचले होते. डोईजोडे व त्यांचे मित्र कैलास पाटील यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य बुधवारी एका लॉजवर थांबले होते. गुरुवारी सकाळी महेश डोईजोडे (४७) व त्यांचा भाऊ बाळासाहेब डोईजोडे (४९), मुंबईचा मित्र कैलास पाटील हे तिघेजण गाणगापूरच्या भीमा-अमरजा नदी संगमात स्नानासाठी (bath) गेले असता महेश व बाळासाहेब या दोघा भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर कैलास पाटील यांच्या तोंडात व पोटात पाणी गेल्यामुळे ते जखमी झाले आहेत. पाटील यांच्यावर गाणगापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाणगापूर येथे महेश व बाळासाहेब यांच्या मृतदेहाची (dead body) उत्तरीय तपासणी करून दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांवर शुक्रवारी सकाळी उदगीर येथे अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहेत.