शिवराज पाटील चाकूरकरांच्या ‘अडचणीं’वर माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची टिप्पणी
लातूर (Amit Deshmukh) : सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात अनेक घरे फोडण्याचे काम केले मराठवाड्यातही अनेक घरे फोडली. बीड, नांदेड, धाराशिव, संभाजीनगर आदी ठिकाणी घरे पडली. लातूर अपवाद राहील, असे वाटले होते. मात्र सत्ताधाऱ्यांची नियत जर पाहिली तर लातूरमध्ये त्यांनी ‘देवघर’ फोडले. मात्र देवघरातला ‘देव’ आपल्याबरोबर आहे, अशी खात्री माजी मंत्री आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी व्यक्त केली.
लातूरमध्ये नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्यासह जालनाचे खा. डॉ. कल्याण काळे व नांदेडचे खा. वसंतराव चव्हाण यांचा सत्कार सोहळा व काँग्रेसचा विभागीय मेळावा शनिवारी लातूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर पार पडला. या मेळाव्यात आ. देशमुख (Amit Deshmukh) बोलत होते.
दैनिक ‘देशोन्नती’ने शनिवारी (दि.10) ‘खासदारांच्या सत्कार सोहळ्यात कौतुकाची थाप मारायला चाकूरकर येथील का?’ असे वृत्त प्रसिद्ध करत ‘शिवराज पाटील यांच्या भूमिकेकडे लातूरकरांचे लक्ष!’ असल्याचे वृत्त दिले होते. मात्र अपेक्षेप्रमाणे चाकूरकर शनिवारच्या मेळाव्यास उपस्थित नव्हते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये याबाबत उलट-सुलट चर्चा होऊ नये, याची काळजी घेत आमदार अमित देशमुख यांनी शिवराज पाटील चाकूरकरांच्या भूमिकेबाबत ‘त्यावर तुम्हीच मार्ग काढू शकता…’ असे साकडे प्रदेश प्रभारींसह मान्यवर नेत्यांना घातले.
खरंतर आजच्या मेळाव्यात ते (शिवराज पाटील चाकूरकर) असायला हवे होते. कालच त्यांना आम्ही निमंत्रण दिले होते. मात्र त्यांनी काही अडचणी बोलून दाखविल्या, असे सांगत त्यावर तुम्हीच मार्ग काढू शकता, असे साकडे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांना घातले. जनसामान्यांमध्ये कुठेही उलटसुलट चर्चेला वाव असू नये. विलासराव देशमुख यांना राजकारणात आणण्याचे काम शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले, हे आम्ही विसरलो नाहीत. शंकरराव चव्हाण यांनी विलासराव देशमुख साहेबांना मोठे केले, हेही आम्ही विसरलेलो नाही. लातूर काँग्रेसची संस्कृती आम्ही व काँग्रेस कार्यकर्ता विसरला नाही काँग्रेस कार्यकर्ता अजून आहे, तिथेच आहे. तो कुठेही गेला नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली.