व्यापार करारावरून गृहमंत्री शाह यांचे राहुल गांधींना आव्हान
गांधीनगर (Amit Shah Gujarat Visit) : गुजरात दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शेतकऱ्यांच्या व्यापार मुद्यावरून जोरदार टीका केली. अमेरिकेसोबतच्या करारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींना खुले आव्हान देत म्हटले की, कोणत्याही मंचावर या, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष शेतकऱ्यांच्या मुद्यावर त्यांच्याशी चर्चेसाठी तयार आहे. खरंतर शेतकऱ्यांचे नुकसान कोणी केले, यावर उघड चर्चा व्हावी, कारण मोदी सरकारने प्रत्येक करारात शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे शाहांनी म्हटले.
अमित शाह यांच्या मते, काँग्रेसने ७० वर्षांत केवळ एकदाच कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना गोंधळात टाकले. याउलट, मोदी सरकार गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत थेट ६ हजार रुपये जमा करत आहे, जेणेकरून त्यांना कर्ज घेण्याची गरज भासू नये. डेअरी क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित व्यापार करारांच्या मुद्यावर राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत अमित शाह म्हणाले की, इंग्लंड, युरोपियन युनियन (EU) आणि अमेरिकेसोबत झालेल्या करारांमध्ये शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. डेअरी क्षेत्राबाबत पसरवण्यात येणाऱ्या शंकांचा फेटाळा लावत त्यांनी स्पष्ट केले की, डेअरी सेक्टर पूर्णपणे संरक्षित आहे. तसेच भारतीय कृषी उत्पादने आणि मच्छीमारांच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत, असेही शाह यांनी सांगितले.
काँग्रेस आणि तिचे नेतृत्व नेहमीच जनतेला दिशाभूल करत असल्याचा आरोप करत शाह यांनी म्हटले की, मोदी सरकारने व्यापार करारांमध्येही शेतकरी आणि डेअरी क्षेत्राचे हित सुरक्षित ठेवले आहे, काँग्रेस केवळ चुकीची माहिती पसरवत आहे.




