परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे आदेश
परभणी (Amit Shah) : महायुती भाजपाच्या उमेदवार मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची सभा बुधवार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिंतूर ते परभणी रोडवरील साई मैदान येथे होणार आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तीची सभा होणार असल्याने जिंतूर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा पर्यंत वाहतूक बदल अंमलात राहिल. या बाबत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी १२ नोव्हेंबरला आदेश काढले आहेत.
जिंतूर शहरातून हिंगोली, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी वाहतूक अवजड व खाजगी प्रवाशी वाहनांच्या रहदारीसाठी बंद करण्यात आली आहे. अवजड वाहनांनी जिंतूर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये याकरीता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच खाजगी वाहनाने प्रवास करणारे प्रवाशी यांना वळण रस्त्याचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जालना कडून जिंतूर कडे किंवा पुढे औंढा नागनाथ कडे जाणारी अवजड वाहने ही देवगाव फाटा येथून जिंतूर कडे न येता सेलू, पाथरी, पोखर्णी, सिंगणापुर फाटा, ताडकळस, पूर्णा मार्गे जातील.
जालना मार्गे जिंतूरकडे किंवा पुढे औंढा नागनाथकडे जाणारी खाजगी वाहने देवगाव फाटा येथून सेलू, मानवत रोड, पेडगाव परभणीकडून जातील. जालना मार्गे जिंतूर व हिंगोलीकडे जाणारी अवजड वाहने मंठा, लोणार, लोणी, रिसोड, सेनगाव मार्गे हिंगोलीकडे जातील. परभणी शहरातून जिंतुरमार्गे जालनाकडे जाणारी वाहने पेडगाव, मानवत रोड, सेलू , देवगाव फाटा मार्गे जातील. हिंगोलीकडून जिंतुरकडे येणारी वाहने औंढा नागनाथ, झिरोफाटा, परभणी, ताडकळस पूर्णा मार्गे जातील.
सभेसाठी वाहन पार्किंग
परभणीकडून येणार्या नागरीकांसाठी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे वाहनतळ उभारण्यात आले आहे. देवगाव फाटा कडून येणारी वाहने वट्टमवार यांच्या प्लॉटमध्ये उभी करण्यात येणार आहेत. तर जिंतूर शहरातून सभेसाठी येणार्या वाहनांसाठी जिल्हा परिषद शाळा बसस्थानक समोर वाहन तळ उभारण्यात आले आहे. औंढा रोडने येणार्या वाहनांसाठी औंढा टि-पॉईंट व लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे वाहनतळ उभारण्यात आले आहे.