लातूर (Dr. Babasaheb Ambedkar) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अवमान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना तातडीने पदावरून बडतर्फ करावे. महाराष्ट्रात आरोपींचे लागेबांधे असलेले मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनाही मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे आणि मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तात्काळ कारवाई करावी, या मागण्यांसाठी लातूर येथील गांधी चौकात संविधान प्रेमी नागरिक मंचच्या वतीने मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण खून प्रकरणाचा खटला निपक्षपातीपणे चालण्यासाठी इतर जिल्ह्यात वर्ग करण्यात यावा, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली.
या निवेदनावर भाई ॲड. उदय गवारे, काॕ. संजय मोरे, उत्तरेश्वर बिराजदार, पांडुरंग देडे, दिलीप आरळीकर, सुशील सोमवंशी, सतीश देशमुख, श्रीरंग शेवाळे, डॉ. गणेश गोमारे, प्रा. सुधीर अनवले, राजकुमार होळीकर, जैनुद्दीन शेख, दत्ता सोमवंशी, अनिल दरेकर, अशोक गायकवाड, दत्ता लोभे, बहादूरसाहेब शेख, बापूसाहेब मांदळे, माणिकराव शिंदे, दशरथ भिसे, नरसिंग घोडके, निशांत वाघमारे, मारुती ढाकणे, भास्कर शिंदे, राहुल लोंढे, व्ही.डी. जाधव, सी.एस. मेटे, ॲड. गोविंद शिरसाट, डी. उमाकांत, शिरीषकुमार शेरखाने, श्रीपती चव्हाण, शिवकुमार बनसोडे, उत्तम लोंढे, शहादत्तखा पठाण, आजम पठाण, प्रताप भोसले’ ॲड. आर. वाय. शेख, भालचंद्र कवठेकर, दीपक साठे, भगवान फावडे, प्राजक्ता सोमवंशी, एन.ए. इनामदार, मनसुख भाई कोतवाल, तुकाराम माने, बी.एम. शिंदे, व्ही.व्ही. गिरी, समाधानताई माने आदींच्या सह्या आहेत.
निधर्मी देशात दैववादाचा पुरस्कार
संपूर्ण देश भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्यकर्त्यांकडून भारतीय संविधानाची पायमल्ली केली जात आहे. देशाच्या राजधानीत भारतीय संविधान जाळून देखील संबंधितांवर कठोर कार्यवाही केली जात नाही. (Dr. Babasaheb Ambedkar) भारतीय संसदेच्या सभागृहात देशाच्या गृहमंत्र्यांकडून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून निधर्मी देशात दैववादाचा पुरस्कार केला, असे राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.