अमरावती (Amravati Airport) : अमरावती विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत साकारण्यासाठी अपेक्षित कामे मिशनमोडवर पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधी उपलब्धता व इतर बाबींसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी दिली. त्यांनी आज (Belora Airport) बेलोरा विमानतळावर जाऊन पाहणी केली.
खा. बळवंत वानखेडे यांच्याकडून बेलोरा विमानतळाची पाहणी
बडनेरानजीक बेलोरा विमानतळाचे (Belora Airport) लवकरच विस्तारीकरण होणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीची लांबी १३०० मीटरवरून १८०० मीटर केल्या गेलेली आहे. जवळपास २०० एकरात विस्तारलेले हे विमानतळ ऑगस्ट २०२४ शुभमुहूर्तावर पूर्ण क्षमतेने सुरू होईल. या ठिकाणी एटीआर स्वरूपाची ७२ आसनी विमाने उतरणार आहेत. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सोयदेखील होणार आहे.
बेलोरा विमानतळाच्या (Belora Airport) विस्तारीकरणाचे काम लवकरच पूर्ण होऊन या ठिकाणाहून विमानसेवा सुरू होईल. असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. खासदार माननीय बळवंत भाऊ वानखडे आणि माजी मंत्री सुनील भाऊ देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सकाळी अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला भेट देऊन अधिका-यांशी चर्चा केली व संपूर्ण विमानतळाची पाहणी केली.
विमानसेवेसाठी मिशनमोडवर कामे करा
यावेळी वानखेडे म्हणाले की, अमरावती हे विभागीय मुख्यालय आहे. त्यामुळे (Amravati Airport) विमानतळाचे अद्ययावतीकरणाच्या कामाची जबाबदारी शासनाने ‘एमएडीसी’कडे सोपवली आहे. त्यानुसार विमानतळावर एटीआर-72 किंवा तत्सम प्रकारची विमाने येथे उतरण्याची सोय होण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्यात येत आहे व येथे रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याची सुविधाही निर्माण होणार आहे. या विमानतळाचा उडान (आरसीएस) या केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत उडान 3.0 मध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमअंतर्गत अमरावती- मुंबई विमानसेवा सुरु करण्याचा मार्ग अलायन्स एअरलाईन्स यांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष विमानसेवा सुरु होण्यासाठी मिशनमोडवर कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे एमएडीसी प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा करून कामांना गती द्यावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे वानखडे यांनी सांगितले.
एटीआर-72 विमाने उतरण्याची सुविधा व नाईट लॅडिंगच्या सुविधेसाठी विस्तारीकरणाची कामे करण्यासाठी ‘एमएडीसी’कडून ‘राईटस् लि.’ या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ‘राईटस् लि.’ ही कंपनी केंद्र शासनाचा उपक्रम असून, ती आरेखन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करेल. या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या संरक्षण, तसेच वने व पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळालेली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत विमानतळाला पाणीपुरवठा उपलब्ध करण्याचे काम यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. महावितरणमार्फत अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम पूर्ण झाले आहे का? . बडनेरा- यवतमाळ वळणरस्त्याचे बांधकाम आणि विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत या कामांची ही यावेळी खासदार वानखडे यांनी माहिती घेतली.. धावपट्टीची लांबी 1372 मीटरवरून 1800 मीटरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. टर्मिनल सह इतर सर्व कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी खासदार वानखडे यांनी संबंधितांना दिले. माजी मंत्री सुनील देशमुख आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप , जयंतराव देशमुख यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.