अमरावती (Marathi Press Council) : पत्रकार संघटनांना एखादी वास्तू उभी करण्यापासून तिची देखभाल करण्यासाठी करावी लागणारी कसरत याची जाणीव आम्हाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पत्रकार भवन उभे झाले परंतू त्याची देखभाल व्यवस्थित न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. परंतू अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवन, ई लायब्ररी आणि अभ्यासिका निर्माण करून अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचे निर्वहन केले आहे त्यामुळे ही वास्तू संपूर्ण राज्यातील पत्रकार संघांसाठी आदर्श बनली आहे असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांचे प्रतिपादन
मराठी पत्रकार परिषदेच्या (Marathi Press Council) विश्वस्तांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील पत्रकार बांधवांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, महिला उपाध्यक्ष जान्हवी पाटील तसेच अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान तीनही विश्वस्तांचा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना किरण नाईक यांनी सांगितले की, राज्यातील पत्रकारांवर जेव्हाही अन्याय झाला त्या प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. पत्रकारांमध्ये पत्रकारिता करताना कुठलेही भय राहू नये यासाठी कायदे करण्यापासून तर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा आपण केला आहे.
विश्वस्तांचा सन्मान सोहळा, पत्रकारांशी साधला संवाद
पत्रकारांना पेंशन लागू करण्यासाठी तसेच अधिस्वीकृती सहज मिळण्यासाठी देखील आपण सातत्याने प्रयत्न केले आहे. बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारकासाठी देखील मराठी पत्रकार परिषदेचेच प्रयत्न फळास आले आहेत. मराठी पत्रकार परिषद भविष्यात डिजीटल मिडियाचा विचार करता संघटनेत डिजीटल मिडियातील पत्रकारांना देखील विशेष सेल स्थापन करून सहभागी करून घेण्यासाठी विचार करते आहे. तरूणांच्या हाती पत्रकार परिषदेची धुरा देण्यासाठी चांगल्या तरूणांचा शोध देखील संघटना घेत असल्याचा विचार देखील नाईक यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरचिटणीस प्रफुल्ल घवळे यांनी तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष विजय ओडे यांनी केले. या कार्यक्रमाला अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच सभासद तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यवर पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संघटनेमुळेच राज्यात ओळख मिळाली- जान्हवी पाटील
मराठी पत्रकार परिषद (Marathi Press Council) ही केवळ संघटना नसून तो पत्रकारांचा परिवार आहे. संघटनेत काम करत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी निरनिराळ्या पातळीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली. आज जी राज्यभरात ओळख मिळाली ही मराठी पत्रकार परिषदेची देण आहे. परिषदेने पत्रकारांच्या हिताकरित लढायला आणि जीवनात खडतर प्रवासातून जगायला शिकवले. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेचा घटक असल्याचा अभिमान असल्याची भावना जान्हवी पाटील यांनी व्यक्त केली.
अमरावतीला अधिवेशनाचा मान देण्यासाठी प्रयत्नशील- शरद पाबळे
अमरावती येथे मराठी पत्रकार परिषदेचे (Marathi Press Council) राज्य अधिवेशन आयोजित करण्याचा विचार संघटनेच्या विचाराधीन आहे. अद्याप त्यावर निर्णय व्हायचा असला तरीही अमरावतीला हा मान देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अमरावती पत्रकार संघाने जे काम आजवर केले आहे ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही भविष्यात सकारात्मक विचार करून अमरावतीला संधी देऊ असे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.