बडनेरा(Amravati):- विधानसभा मतदार संघात (Assembly constituencies) सर्व सामान्य जनता आ. रवी राणा यांना कंटाळली असून या मतदार संघात महायुतीने भाजपा साठी मतदार संघ सोडून भाजपा नेत्याला उमेदवारी द्यावी या मागणी साठी बडनेरा विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांची एकजूट झाली आहे.
बडनेराचे भाजपा कार्यकर्ते एकजूट
काल भाजपा बडनेरा मंडलाची कार्यकर्ता संवाद बैठक आयोजिण्यात आली होती. या बैठकीला निरीक्षक म्हणून भाजपाच्या जेष्ठ नेत्या किरणताई महल्ले उपस्थित होत्या. या बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांनी आ. राणा यांच्या विषयी संतप्त भावना मांडल्या. आम्ही आता दुसऱ्यांची पालखी वाहणार नाही. लोकसभा निवडणुकीत झालेली चूक पुन्हा पक्षाने करू नये. लोकसभेत आम्ही पक्षश्रेष्ठींचे ऐकले. मोदीजींसाठी आम्ही काम केले. मात्र, आता भाजपा कार्यकर्ता असा लादलेला उमेदवार स्वीकारणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांनी एकदिलाने मांडली. नवनीत राणा (Navneet Rana)तीन लोकसभा निवडणूक लढल्या. त्यांचे पती आमदार असताना पूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये बडनेरा मतदार संघात त्या मागे होत्या. यावेळी भाजपाचे (BJP)कमळ घेताच त्यांना बडनेरा मतदार संघात उल्लेखनीय मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य भाजपा मुळे मिळाले. या मतदारसंघावर भाजपाचा दावा आहे आणि यावेळी हा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी एकमुखाने पक्ष निरीक्षकांकडे केली.
आम्ही विद्यमान आमदाराला हरवून भाजपा उमेदवार निवडून आणू
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जयंत डेहणकर आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य तुषार भारतीय यांचा बडनेरा मतदारसंघात प्रभाव आहे. या तिन्ही नेत्यांच्या तीन तीन पिढ्या भाजपा विचारांवर कार्यरत आहे. आमच्या जवळ एवढे सक्षम नेतृत्व असताना आम्ही राणांच्या दरबारात मुजरा करायला जाणार नाही. वरील तीन नेत्यांपैकी कोणालाही उमेदवारी द्या. आम्ही विद्यमान आमदाराला हरवून भाजपा उमेदवार निवडून आणू, अशी आग्रही मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे, या भावनांकडे पक्षाने दुर्लक्ष केले तर लोकसभा निवडणुकीपेक्षा मोठे अपयश पदरी येईल, या आशयाच्या भावना कार्यकर्त्यांनी व स्थानिक पदाधिकाऱयांनी बैठकीत मांडल्या. हाच सूर संपूर्ण मतदार संघात ऐकायला मिळतो आहे. वरिष्ठ भाजपा नेत्यांशी जवळीक आणि खालच्या कार्यकर्त्यांवर वरवंटा फिरवणारे रवी राणा आम्हाला नको, असा सर्वांचा सूर होता. भाजपा बडनेरा मंडल अध्यक्ष डॉ वीरेंद्र ढोबळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.