आयआयएमसीत ‘कुलगुरू – विद्यार्थी ‘ संवाद कार्यक्रम
अमरावती (Amravati University) : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एकच माहिती वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याची पद्धत रूढ होत आहे. त्यामुळे अनेकदा समज-अपसमज सुध्दा पसरतो. सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात असल्याने माहितीची खातरजमा न करताच बातम्या फॉरवर्ड केल्या जातात. त्यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हता अधिक बळकट करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर असल्याचे प्रतिपादन (Amravati University) अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते (Dr. Milind Barhate) यांनी केले.
भारतीय जन संचार संस्थान पश्चिम क्षेत्रीय परिसर अमरावतीच्या वतीने शुक्रवार दि. २३ ऑगस्ट, २०२४ रोजी सत्रारंभ निमित्त ‘कुलगुरू – विद्यार्थी ‘ संवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत गाडगे बाबा (Amravati University) अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाहा होते. यावेळी विचारमंचावर डॉ. विनोद निताळे, संजय पाखोडे,चैतन्य कायंदे पाटील, जयंत सोनोने, निकिता वाघ उपस्थित होते.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते (Dr. Milind Barhate) म्हणाले की, शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग कार्य क्षेत्रात करताना ते लोकांना बातमीच्या माध्यमातून न्याय देणारे ठरावे, यासाठी विद्यार्थ्यांनी कसोशीने प्रयत्न करावे. हाती आलेल्या मोबाईलमुळे प्रत्येकच व्यक्ती बातमीदार बनत आहे. तो आशयाची विश्वासार्हता न तपासता त्याला फॉरवर्ड करण्याच्या मागे असतो. त्यामुळे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी मूल्यांची तडजोड न करता सत्य समाजासमोर मांडावे. पत्रकार म्हणून काम करत असताना समाज, वाचक व देश हित जपूनच वृत्तांकन करावे. बातमीमध्ये स्वतःच्या विचारांना कुठेही जागा न देता घडलेली घटना, माहिती जशी आहे तशी समाजासमोर मांडणे हीच देशसेवा आहे.
कुलगुरू डॉ. बारहाते (Dr. Milind Barhate) पुढे म्हणाले की, पत्रकारिता हे दुधारी शस्त्र आहे त्यामुळे या क्षेत्रात करिअर करताना अभ्यासात सातत्य, नीतिमत्ता व वैचारिक प्रगल्भता विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी. पत्रकारिते सारख्या प्रचंड संधी असलेल्या क्षेत्रात करिअर करताना अडचणी येणारच त्यावर मात करण्याची मानसिकता आतापासून तयार करा. अडचणीचे रूपांतर संधी सुद्धा होऊ शकते असे ही ते शेवटी म्हणाले. यावेळी प्रश्न उत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे कुलगुरू डॉ. बारहाते यांनी समर्पक उत्तर देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाहा म्हणाले की, शैक्षणिक विद्यारंभ हा एक संस्कार आहे. यानिमित्य कुलगुरूंचा विद्यार्थ्यांशी संवाद ही सत्राची अविस्मरणीय सुरुवात आहे.
आयआयएमसीत देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले आहे. येणार्या काळात प्रसार माध्यमात नीतीमत्तेने व गुणवत्तापूर्ण कार्य करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. विनोद निताळे यांनी तर आभार चैतन्य कायंदे पाटील यांनी मानले. यावेळी मराठी, हिंदी, इंग्रजी पत्रकारितेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय पाखोडे, राजेश झोलेकर, नुरूझुमा शेख, भूषण मोहोकार, संदीप अग्रवाल अनंत नांदुरकर आदींनी सहकार्य केले.