अमरावती(Amravati):- राज्यातील विधानसभा निवडणुकीला (Assembly Elections) अवघे अकरा दिवस शिल्लक आहे. निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारसोबतच जिल्हा परिषद प्रशासन सुध्दा निवडणुकीची टक्केवारी वाढण्यासाठी विविधांगी प्रयोगांची मालिका राबवित आहे. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकास मतदान करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेश द्वारापासून ते आतपर्यंत 34 विविध प्रेरणादायी पोस्टर प्रदर्शनी लावली आहे.
ज्ञानेश्वर घाटे यांच्या संकल्पनेतून ‘वॉल ऑफ प्राऊड वोटर्स’ निर्माण करण्यात आले
एखादा कलावंत ज्याप्रमाणे त्याची कला कॅनव्हास पेपर वर साकारून त्याच्या कलेची प्रदर्षनी भरवतो. त्याच धर्तीवर या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत व या निवडणुकीसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तीची व सामाजिक संघटनांची दखल जिल्हा परिषदेने घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र व स्विय सहायक ज्ञानेश्वर घाटे यांच्या संकल्पनेतून ‘वॉल ऑफ प्राऊड वोटर्स’ निर्माण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी, समाजातील बचत गटातील काम करणाऱ्या महिला, दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सहकार्य करणारे वॉरियर्स, ईव्हीएम द्वारा मतदान कसे करायचे या बाबत मार्गदर्शन करणारे स्वयंसेवक, महिला दिनाच्या औचित्यावर रॅली काढणाऱ्या रणरागिणी, मतदानासाठी सजगतेने कर्तव्य निभावणारे पोलीस बांधव, ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीताईंचा पिंक फोर्स, पथनाट्य करणारे रंगकर्मी, बीएलओ म्हणून काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वीप अभियानातील कर्मचारी, गुलाबी मतदान केंद्रातील कर्मचारी,तसेच मतदानाला प्रेरित करणारे स्लोगन आदी विविध 34 पोस्टर ची प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. प्रवेशपासून ही खुली ‘वॉल ऑफ प्राऊड वोटर्स’ प्रदर्शन सह निवडणूक विभागद्वारा अठरावे वरीस मोक्याचं, इथे सर्व बोटे सारखीच असे जनजागृती करणारे मोठे बॅनर झळकले आहे.ही संकल्पना जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापाञ,ज्ञानेश्वर घाटे,संजय राठी,राजेश सावरकर,हेमंतकुमार यावले,नितिन माहोरे,श्रीकांत मेश्राम,आदित्य तायडे,गजानन कोरडे,अतुल देशमुख सह टिमची आहे.
अमरावतीचा वोटोबा ठरतोय चर्चेचा विषय
अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रत्येक स्वीप नोडल अधिकारी द्वारा सर्वात कमी मतदान झालेल्या भागात जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. स्वीप कक्ष अंतर्गत अमरावतीत वोटोबा हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या स्टेटस वर वोटोबासह येत्या 20 नोव्हेंबर ला ‘मी मतदान करणार’ असल्याचे नवनवीन पोस्ट झळकत आहे.