परभणी/गंगाखेड (Parbhani):- जुन्या भांडणाच्या कारणातून शहरातील एका अभ्यासिकेत जाऊन २२ वर्षीय तरुणास लोखंडी रॉडने (Iron rod) मारहाण केल्याची घटना सोमवार २७ जानेवारी रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी मंगळवार रोजीच्या मध्यरात्रीला गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला आहे.
दोघांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील अकोली येथील रहिवासी असलेल्या महेश लक्ष्मण पोले वय २२ वर्ष या तरुणाचे काही दिवसांपूर्वी विश्वास बालासाहेब देवकते याच्या सोबत भांडण झाले होते. सोमवार २७ जानेवारी रोजी महेश पोले हा तरुण गंगाखेड शहरातील अभ्यासिकेत अभ्यासासाठी आला असतांना दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास तिथे आलेल्या विश्वास बालासाहेब देवकते व कल्पेश लिंबाजी व्हावळे यांच्यापैकी विश्वास बालासाहेब देवकते याने जुन्या भांडणाच्या कारणातून जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले तर कल्पेश व्हावळे याने फायबरच्या दांड्याने खुब्यावर, दंडावर मारहाण करून जखमी केले.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अनिकेत पोले याने यावेळी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता तु भांडणात मध्यस्थी करू नको, तु यात पडला तर तुला खतम करून टाकू असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतांना महेश पोले यांनी दिल्यावर मंगळवार रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात विश्वास बालासाहेब देवकते व कल्पेश लिंबाजी व्हावळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड हे करीत आहेत.