औराद शहाजानी (Anganwadi) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील मरीआई चौकामध्ये असलेली अंगणवाडी क्रमांक ७ ही अखेर काल पडली. अंगणवाडीत बालकांसाठी आलेले खेळाचे साहित्य व इतर साहित्याची नासधूस झाली. (Anganwadi) अंगणवाडी मध्यरात्री पडल्यामुळे सुदैवाने काही जिवीतहानी झाली नाही.
मरीआई चौकामध्ये असलेली अंगणवाडी क्रमांक ७ ही गेल्या दोन वर्षांपासून पाठीमागच्या बाजूला प्राणी (वराह) बसल्यामुळे व त्या प्राण्यांनी पाठीमागच्या बाजुला संपूर्णतः पाया हा उकरून काढला असल्यामुळे अंगणवाडी (Anganwadi) ही अर्धवट उभी होती. तसेच आतमधील फरशी सुध्दा खालची बाजू पोखर बनल्यामुळे अंगणवाडी कार्यकर्ती भंडारे एस.एम. या दोन वेळा पायाला मार लागून जखमीही झालेल्या होत्या.
त्यांनी तशी दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करुन स्वतःच्या तसेच मदतनीस आणि लहान लहान बालकांच्या जिवीतास धोका होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत, एकात्मिक बालविकास अधिकारी निलंगा व जिल्हा परिषद लातूर यांनाही कळविले होते. पण दुर्दैवाने गाफील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काल मध्यरात्री अखेर ती अंगणवाडी पडली व आतमध्ये असलेल्या साहीत्याची नासधूस झाली आहे. त्यामुळे आतातरी प्रशासन जागे होईल काय? असा सवाल पालक व गावकऱ्यांच्यावतीने करण्यात येत आहे.