माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शुभारंभ
निलंगा (Annabhau Sathe memorial) : लहूजी शक्ती सेना पदाधिकार्यांच्या उपस्थितीत साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य दिव्य स्मारक निलंगा येथे होणार असून गेल्या अनेक वर्षापासूनच्या या मागणीमुळे मातंग समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटिल निलंगेकर यांच्या हस्ते सोमवारी दि. १४ रोजी स्मारक व सुशोभिकरण कार्याचा शुभारंभ करण्यात आला.
लहूजी शक्ती सेना व सकल मातंग समाज बांधवांनी अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याची गेल्या कांही वर्षापासून मागणी होत होती. या पूर्णाकृती पुतळा व स्मारकासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटिल निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून आनंदमुनी चौकात मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आली. साहित्य विश्वातील एक अढळ ध्रुव तारा म्हणून आपली ओळख निर्माण करणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. ही लवकर स्मारक व्हावे यासाठी लहुजी शक्ती सेनेकडून येथील उपविभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषण पुकारले होते.
यानिमित्त आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. अण्णाभाऊ हे आपल्या सर्वांसाठीच एका दीपस्तंभासारखे आहेत. येणाऱ्या पिढीला त्यांच्याकडून आदर्श मिळावा, यासाठी आपण हे स्मारक उभारत असून समाज बांधवांच्या सर्व भावनांचा आदर करून हे स्मारक उभे राहील, असे आश्वस्त करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. याला सर्व आंदोलन कर्त्यांनी मान देऊन उपोषण मागे घेतले. आज त्यांच्याच उपस्थितीमध्ये शुभारंभाचा हा सोहळा पार पडला. निलंगा शहरातील प्रास्ताविक स्मारकाच्या सुशोभीकरण कार्याचा शुभारंभ आजपासून करण्यात आला. अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आमरण पोषण पुकारलेल्या लहूजी शक्ती सेना व सकल मातंग समाज बांधवांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे निलंगा तालुकाध्यक्ष रामजी कांबळे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, नागनाथ घोलप, ओम शिंदे, निलंगा नगरपालिकेचे नगर रचनाकार कैलास धाईत, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, तात्याराव मिस्त्री, रमेश कांबळे, श्रीधर कांबळे, प्रसाद कांबळे, आंदोलकाची आई नंदाताई कांबळे व अन्य आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.