जिल्हा परिषद शाळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने!
रिसोड (Annabhau Sathe) : आज वाकद येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये भारतीय संस्कृती संवर्धन संस्था, वाशिम आणि जिल्हा परिषद शाळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिके’चे उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद शाळा समितीचे अध्यक्ष श्री. पुंजाजी मामा ढोले उपस्थित होते, तर मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताचे प्रांत प्रचारक श्री. गणेशजी शेटे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरवपूर्ण उपस्थिती लावली.
भारत माता आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन!
अभ्यासिकेचे उद्घाटन व कार्यक्रमाची सुरुवात भारत माता आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप मापारी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात अभ्यासिकेची आवश्यकता आणि तिचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर संस्थेचे सचिव श्री. विक्रमजी वावरे सर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, “संस्थेचे जिल्हाभर विविध उपक्रम सुरू असून, आम्ही सरकारकडून कोणताही निधी घेत नाही. समाजाकडून निधी गोळा करून पुन्हा समाजासाठीच काम करतो.” वावरे सरांनी गावातील तरुणांनी या अभ्यासिकेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि गावाच्या तसेच समाजाच्या (Society) प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
तरुण मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित!
यानंतर जिल्हा परिषद शाळेचे श्री. तायडे सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान योगेश जोशी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. मुख्य अतिथी श्री. गणेशजी शेटे यांनी उद्बोधन करताना सांगितले. “युवकांनी चारित्र्यसंपन्न, नागरी शिष्टाचार पाळणारे आणि समाज व राष्ट्रासाठी कार्य करणारे असावे. अशा अभ्यासिकांमधूनच मोठे अधिकारी तयार होतील आणि राष्ट्रनिर्माणात त्यांचा मोलाचा वाटा असेल.” कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपाल चोपडे यांनी केले. याप्रसंगी शाळा समितीचे उपाध्यक्ष पंजाब अंभोरे, योगेशजी मोरे, निलेशजी चरपे, तसेच गावातील तरुण मंडळी व ग्रामस्थ (Villagers) मोठ्या संख्येने उपस्थित होते.