शिवजन्मोत्सव सोहळ्यात होणार वितरण
टाळमृदंगाच्या गजरात निघणार दिंडी
परभणी (Warkari Awards) : जिल्हा वारकरी मंडळाच्या वतीने दरवर्षी राजे छत्रपती शिवराय शिव जन्मोत्सव सोहळा साजरा करत असताना विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षीच्या समाजभूषण, वारकरी भूषण, एक संघ परिवार, भक्त पुंडलिक या चार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून बुधवार १९ फेब्रुवारी रोजी (Warkari Awards) पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती हभप बालासाहेब मोहिते पाटील यांनी केले आहे.
जिल्हा वारकरी मंडळाच्या वतीने बुधवार १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त सकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात (Warkari Awards) शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात येणार आहे. नंतर पुतळ्यापासून वसमत रोडवरील वारकरी शिक्षण संस्थेपर्यंत पायीदिंडी काढण्यात येणार आहे. याठिकाणी पोवाडा गायन, कीर्तनानंतर दुपारी १२ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. शिवजयंती सोहळ्याचे उद्घाटन हभप राम महाराज काजळे, हभप राम महाराज मिरखेलकर यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावर्षी जिल्हा वारकरी मंडळाने पुरस्कारांची घोषणा केली आहे.
यामध्ये अॅड. माधवराव एकनाथराव भोसले (समाजभूषण पुरस्कार), अरुण विश्वनाथराव पेडगावकर (भक्त पुंडलिक पुरस्कार), हभप माधवराव तुकारामजी अवचार( वारकरी भूषण पुरस्कार), शोभाताई राजेश्वर स्वामी वसेकर (एकसंघ परिवार मॉ जिजाऊ पुरस्कार) यांचा समावेश आहे. या कार्यक्रमानंतर महाप्रसाद होईल. शिवप्रेमी मंडळींनी या (Warkari Awards) शिवजन्मोत्सवात सहभाग नोंदवावा, असे आवाहन हभप बालासाहेब मोहिते पाटील, त्र्यंबक डोंगरे, अरुण पेडगावकर, नवनाथ पवार, विशाल तनपुरे, प्रभाकर मोहिते व समस्त परभणी जिल्हा वारकरी मंडळ आदींनी केले आहे.