हिंगोली(Hingoli) :- शहरातील अनुराधा अर्बन पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संचालक मंडळासह कर्मचारी अशा १८ जणांना सहाय्यक निबंधक कार्यालयाने कारणेे दाखवा नोटीस बजावली असून ८ ऑगस्ट पर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खुलासा प्राप्त न झाल्यास कायदेशीर कारवाई (action) करण्याचा इशाराही दिला आहे.
अर्बन पतसंस्थेत ४०३८ ठेवीदारांची ६.२७ कोटी रुपयांची फसवणुक
हिंगोली येथील अनुराधा अर्बन पतसंस्थेत ४०३८ ठेवीदारांची ६.२७ कोटी रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघड झाला होता. ठेवीदारांना जादा व्याजाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून ठेवी घेण्यात आल्या. मात्र मुदत संपल्यानंतरही त्यांना पैसे परत करण्यात आलेच नाही. तर त्यानंतर पतसंस्था (credit institution) बंद पडली. या प्रकरणी पतसंस्थेचे संचालक मंडळ तसेच कर्मचाऱ्यांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एन. बी. काशीकर यांच्या पथकाकडून तपास केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात सहाय्यक निबंधक कार्यालयानेही चौकशी सुरु केली आहे. यामध्ये गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित केली जाणार असून सहकार अधिकारी व्ही. ए. गिते यांच्या पथकाकडून चौकशी केली जात आहे. यामध्ये सहकार अधिकारी गिते यांनी या प्रकरणात आर्थिक जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात खुलासा करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
सर्वांना ८ ऑगस्ट पर्यंत खुलासा करण्याचे आदेश
यामध्ये पतसंस्थेच्या संचालक मंडळामध्ये अशोक वामनराव कांबळे, उमा देवानंद येल्हेकर, मोहन मनीराम सोनटक्के, मनिषा प्रशांत बिनोरकर, बाजीराव मनी राव शैक्यू, शामला कांतराव खर्जुले, संतोष धोंडोपंत खर्जुले, मनिषा सुभाष कल्याणकर, तृप्ती देवानंद येल्हेकर, रेखा भास्कर खर्जुले, तेजस्विता राजेंद्र शेगोगार, मनिषा मनोज डोळकर, मोहम्मद साजीद अब्दुल खदीर, अनुराधा वामनराव कांबळे, सिमा अशोक कांबळे, प्रदीप कृष्णराव पत्की, मोतीराम चंपती जगताप, शुभम राजू घाटोळ यांचा समावेश आहे. या सर्वांना ८ ऑगस्ट पर्यंत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.