शासनाला कोट्यवधींचा चूना; मुळ कागदपत्रांच्या चौकशीची मागणी
सेलू (Agricultural Solar Pump Scheme) : राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेत एक धक्कादायक गैरप्रकार समोर आला आहे. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकर्यांसाठी असलेल्या अनुदानाचा आणि सवलतींचा गैरफायदा घेत, इतर प्रवर्गातील अपात्र लाभार्थ्यांनी कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून मागासवर्गीय प्रवर्गातून सौर पंप लाटल्याचा प्रकार समोर येत आहे. या प्रकारामुळे मूळ मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू शेतकर्यांच्या हक्कावर गदा आली असून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेअंतर्गत ३, ५ आणि ७.५ एचपी क्षमतेचे सोलर पंप वितरीत केले जातात. या योजनेत सर्वसाधारण व इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या तुलनेत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकर्यांचा आर्थिक हिस्सा अत्यंत कमी ठेवण्यात आला आहे. ३ एच.पी. सोलर पंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी २१ हजार ९८२ तर अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गासाठी १० हजार ९९१ हिस्सा आहे. ५ एच.पी सोलर पंप सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३० हजार ६९४ तर अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गासाठी १५ हजार ३४७ रूपये हिस्सा आहे. ७.५ एच.पी. सोलर पंप सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ हजार ९९४ तर अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गासाठी २१ हजार ४९७ हिस्सा आहे.
लाभार्थी हिस्यातील याच मोठ्या फरकाचा फायदा घेण्यासाठी अनेक इतर प्रवर्गातील अर्जदारांनी स्वार्थापोटी अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गातून अर्ज भरून कमी रकमेत सौर पंप प्राप्त केले आहेत. तालुक्यातील विविध गावातील समोर आलेल्या यादीनुसार अनेक लाभार्थी संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत.तालूक्यात अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गातील गावनिहाय लाभार्थी देऊळगाव गात - ३०, लाडनादरा - ४६, खवणे पिंपरी -४०, वालूर ५४, म्हाळसापूर २४, कन्हेरवाडी १४, कुंडी १४, डासाळा १२, बोरगाव जहांगीर ११, रायपूर ११, रवळगाव ११, सेलू ११, हातनूर ९, कुपटा ९, डुगरा ८, हिस्सी ७, राधे धामणगाव ७, शिंदे टाकळी ७, हदगाव (खु.)७, भांगापूर ६, ब्राह्मणगाव ६, चिकलठाणा (बु) -६, धनेगाव ६ . गुगळी धामणगाव ६, हट्टा ५, नरसापूर ५, निपाणी टाकळी ५, पार्डी कौसडी ५, तिडी पिंपळगाव ५, वलंगवाडी ५, आडगाव दराडे ५,नागाठाणा ४, राव्हा ४, सावंगी (पि.सी.) ४, सिद्धनाथ बोरगाव ४, सोन्ना ४, गोहेगाव ४ आदीसह इतर गावातील समावेश आहे.
सौर पंप मिळवण्यासाठी (Agricultural Solar Pump Scheme) अर्ज करताना आधार कार्ड, ७/१२ व ८-अ उतारा, बँक पासबुक यासोबत जातीचा दाखला जोडणे अनिवार्य असते. असे असताना महाऊर्जा किंवा संबंधित एजन्सीच्या अधिकार्यांनी अर्जांची योग्य पडताळणी का केली नाही? हा केवळ कर्मचार्यांचा हलगर्जीपणा आहे की मध्यस्थांच्या संगनमताने झालेला भ्रष्टाचार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
'अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी असणार्या सवलतींचा इतर प्रवर्गातील लोकांकडून गैरवापर होणे हा मुळ मागासवर्गीय शेतकर्यांवर अन्याय आहे. शासनाने या प्रकरणातील सर्व लाभार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तात्काळ चौकशी करून बोगस लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि अनुदानाची कडक वसुली करावी.' अशी मागणी होत आहे.
दोषीवर गुन्हे दाखल करणार
तालूक्यात कृषी सौर पंप योजनेत अनूसूचित जाती /जमाती प्रवर्गातून ५०७ शेतकरी लाभार्थ्यांनी आँनलाईन अर्ज सादर करून पात्र ठरले आहेत.दरम्यान सदरिल लाभार्थ्यांचे मूळ आधार कार्ड,जातीचा दाखला,सातबारा उतारा आदी कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.सदरिल लाभार्थी शेतक-यांना पडताळणीसाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्यात येत आहे. ज्या बोगस लाभार्थ्यांनी कृषी सौर पंप योजनेतून लाभ घेतला असेल अशा लाभार्थ्यांकडून वसूली व ऑनलाईन केलेल्या सेंटर चालकांची चौकशी करून गून्हे दाखल करण्यात येणार आहे. - नागनाथ शंकरवार, उप-कार्यकारी अभियंता सेलू जि.परभणी