मानोरा : बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळावा, या मागणीसाठी जिंतूर येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा प्रश्न आता शासनदरबारी पोहोचला आहे. धर्मगुरू तथा विधान परिषद सदस्य डॉ. बाबूसिंगजी महाराज यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलिस महासंचालकांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
१२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री जिंतूर पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक ०५३९ अन्वये आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी बंजारा समाजाकडून सातत्याने करण्यात येत होती.
या संदर्भात समाजाच्या वतीने डॉ. बाबूसिंगजी महाराज यांच्याकडे निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणी पुढाकार घेत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.
इतर समाजाच्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या धर्तीवर बंजारा आंदोलकांवरील गुन्ह्यांचाही सहानुभूतीपूर्वक व कायदेशीर विचार करून ते मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या पुढाकाराबद्दल बंजारा समाजाच्या वतीने डॉ. बाबूसिंगजी महाराज यांचे आभार व्यक्त करण्यात आले.