पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालय नंगारा भवनच्या तिकिटाचे दर १०० रुपयांनी कमी
५ नोव्हेंबर २०२६ पासून नवा निर्णय लागू
मानोरा (Banjara Heritage Museum Nangara Bhavan) : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आणि देशभरातील भाविकांचे आकर्षण केंद्र असलेल्या पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालय नंगारा भवन येथील तिकिटाचे दर १०० रुपयांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दि. ५ नोव्हेंबर रोजी घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सामान्य गोर-गरीब भाविकांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई येथे आयोजीत बैठकीत हा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तसेच मंत्री संजय राठोड, संत, महंत सर्वांच्या उपस्थितीत घेण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून तिकिटाचे दर सामान्य गोर-गरीबांना परवडावे, यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत होते. त्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. तिकिटाचे दर कमी व्हावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्ते यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
बंजारा विरासत संग्रहालय (Banjara Heritage Museum Nangara Bhavan) हे केवळ संग्रहालय नसून बंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचा जिवंत ठेवा आहे. मात्र, तिकिटाचे दर जास्त असल्याने अनेक गोर-गरीब कुटुंबांना ते पाहता येत नव्हते. आता दर कमी झाल्यामुळे प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक भाविकाला आपला वारसा जवळून पाहता येणार आहे.
या (Banjara Heritage Museum Nangara Bhavan) निर्णयामुळे पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येतही मोठी वाढ होणार असून, स्थानिक रोजगार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री बावनकुळे आणि मंत्री संजय राठोड यांनी घेतलेल्या या निर्णयाचे राज्यासह पोहरादेवी येथील संपूर्ण बंजारा समाजातून स्वागत होत आहे. संत - महंतांनीही या निर्णयाला आशीर्वाद दिला असून, सामान्य जनतेसाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.