चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ ठरले; प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष महत्त्वाची
मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डोंगराळे बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने कठोर भूमिका घेत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. चार वर्षीय चिमुरडीवरील अमानुष अत्याचार आणि तिच्या हत्येच्या या प्रकरणाचा निकाल शुक्रवारी मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने जाहीर केला. या घटनेने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
डोंगराळे परिसरात १६ नोव्हेंबर २०२५ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात विजय खैरनार याला दोषी ठरवण्यात आले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ श्रेणीत मोडत असल्याचे नमूद करत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात शासन नियुक्त विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारची बाजू मांडली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मालेगावमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पीडितेच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदतही देण्यात आली आहे.
प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष ठरली महत्त्वाची
या खटल्यात प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष महत्त्वाची ठरल्याचे समोर आले आहे. आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार केल्याचे प्रकरणात नमूद करण्यात आले होते. तसेच, अत्याचारानंतर मुलीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला होता.
खटल्यात परिस्थितीजन्य पुराव्यांसोबत बाल साक्षीदाराच्या साक्षीलाही महत्त्व देण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे आरोपीविरोधातील बाजू न्यायालयासमोर मांडण्यात आली.
पीडितेच्या वकील स्नेहा ठाकरे यांनी काय सांगितले होते?
या प्रकरणाबाबत पीडितेच्या वकील स्नेहा ठाकरे यांनी यापूर्वी प्रतिक्रिया देताना बाल साक्षीदाराची साक्ष हा खटल्यातील महत्त्वाचा पैलू असल्याचे सांगितले होते. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या या अमानुष घटनेत पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची भूमिका होती.
बाल साक्षीदाराकडून मिळालेली माहिती योग्य पद्धतीने नोंदवून ती पुराव्यांच्या स्वरूपात न्यायालयासमोर सादर करणे हे या खटल्यातील मोठे आव्हान होते, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.
अखेर शुक्रवारी न्यायालयाने आरोपी विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली. चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना मालेगावमध्ये व्यक्त होत आहे.