भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारातील दुर्दैवी घटना; १ नोव्हेंबरला मुलीचा साखरपुडा, पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर
जळगाव : मुलीच्या साखरपुड्याची तयारी सुरू असताना भुसावळ तालुक्यातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुसरी गावाच्या शिवारातील स्वतःच्या शेतात काम करताना विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू झाला. अशोक बाबूराव पाटील (वय ५५) आणि सरीता अशोक पाटील (वय ४३) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. येत्या १ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुलीचा साखरपुडा होणार होता. या घटनेमुळे सुसरी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील आणि सरीता पाटील हे मजुरांसह सुसरी गावाच्या शिवारातील गट क्रमांक १२८/१ मधील आपल्या शेतात कामासाठी गेले होते. शेतात कांद्याची लागवड करण्यात आली असून त्या ठिकाणी निंदणी आणि खुरपणीचे काम सुरू होते.
याचदरम्यान, शेतातील विद्युत खांबावरून एक तार तुटून गवतात पडली होती. या तारेचा स्पर्श अशोक पाटील यांना झाल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. पतीला वाचवण्यासाठी सरीता पाटील त्यांच्या जवळ गेल्या असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याची माहिती फिर्यादीत नमूद आहे.
दोघांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच शेजारच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर पती-पत्नीला तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले.
मुलीच्या साखरपुड्यापूर्वीच आई-वडिलांचा मृत्यू
अशोक आणि सरीता पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा १ नोव्हेंबर रोजी नियोजित होता. मुलीच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रसंगासाठी कुटुंबात तयारी सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. मुलीच्या नव्या आयुष्याची सुरुवात पाहण्याचे आई-वडिलांचे स्वप्न या घटनेमुळे अपूर्ण राहिले.
मृत दाम्पत्याच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि आई असा परिवार आहे. कुटुंबातील दोन्ही प्रमुख व्यक्तींचा एकाच दुर्घटनेत मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
वरणगाव पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणाची वरणगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुखराम सावकारे या घटनेचा तपास करत आहेत.
शेतातील विद्युत तार नेमकी कोणत्या कारणामुळे तुटून खाली पडली, याचा शोध पोलीस घेत आहेत. या दुर्घटनेमुळे शेतीच्या कामादरम्यान विद्युत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.