भंडारा शेतकरी आत्महत्या

भंडार्‍यात पालकमंत्र्यांसमोर रडत रडत व्यथा मांडणार्‍या शेतकर्‍याची आत्महत्या

Bhandara Farmer Suicides: मोहाडी तालुक्यातील आंधळगावजवळील धोप येथे दुष्काळाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकर्‍याने विहिरीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली.

भंडार्‍यात पालकमंत्र्यांसमोर रडत रडत व्यथा मांडणार्‍या शेतकर्‍याची आत्महत्या

Bhandara Farmer Suicides

 

आठवड्याभरापूर्वी दुष्काळाची व्यथा मांडली अन् आज विहिरीत सापडला मृतदेह

तुमसर/ भंडारा (Bhandara Farmer Suicides) : मोहाडी तालुक्यातील आंधळगावजवळील धोप येथे दुष्काळाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकर्‍याने विहिरीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि.८ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. राजेंद्र अंबर सपाटे असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर मोहाडी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना याच शेतकर्‍याने पालकमंत्र्यांसमोर रडत रडत दुष्काळाची व्यथा मांडत आपल्या अडचणीचा टाहो फोडला होता.

दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची व्यथा संबंधित (Bhandara Farmer Suicides) शेतकर्‍याने पालकमंत्र्यांसमोर मांडली होती. मात्र त्यानंतरही शेतकर्‍याला अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. व्यथा मांडल्यानंतर अवघ्या काही दिवसांनंतर राजेंद्र सपाटे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने प्रशासनाच्या मदतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आज सकाळी राजेंद्र सपाटे यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी गावकर्‍यांनी पोलिसांसह प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र काही दिवसानंतर त्याच (Bhandara Farmer Suicides) शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याने शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर शासनाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे.

मोहाडी तालुक्यात तिव्र दुष्काळ सदृष्य परिस्थिती असतानाही शासनाकडून अद्याप तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेला नाही. केवळ ग्राऊंडलेव्हल ट्यूनिंग सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले गेले. जर शासनाने तातडीने दुष्काळ जाहिर केला असता तर कदाचित या शेतकरी राजाला जगण्याची नवी आशा मिळाली असती, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. रांजेद्र सपाटे यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. त्यांचा (Bhandara Farmer Suicides) शेती हाच जगण्याचा एकमेव आधार होता. मात्र निसर्गाच्या लहरीपणाने आणि सततच्या दुष्काळाने त्यांचे कंबरडे मोडले होते. पीके हातची गेल्यामुळे आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा या विंवचणेतून त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.