खराडीतील रिव्हरडेल सूट इमारतीतील घटना; वडिलांच्या तक्रारीनंतर अजय कुमार भाटियाविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू
पुण्यातील खराडी परिसरात एका तरुण आयटी इंजिनिअरच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. ड्रग्सच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जात असल्याच्या आरोपातून हा प्रकार समोर आला आहे. शिखर कुमार गौरव सक्सेना असे मृत तरुणाचे नाव असून, त्याने रिव्हरडेल सूट इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अजय कुमार भाटिया याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिखर कुमार हा पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मुलाच्या मृत्यूमागील कारणांबाबत वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले. संबंधित व्यक्तीकडून धमकावून पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
२९ सप्टेंबरपासून तरुण बेपत्ता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर कुमार २९ सप्टेंबर रोजी घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र तो सापडत नव्हता. त्याचा मोबाइल फोनही बंद येत होता. त्यामुळे त्याच्या बेपत्ता होण्याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, पुढे त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीतून मृत्यूमागील कथित कारण समोर आले.
ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप
शिखर कुमार हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी पुण्यातील खराडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, अजय कुमार भाटिया नावाची व्यक्ती शिखरला वारंवार फोन करून धमकावत होती. ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात होती, असा आरोप वडिलांनी केला आहे. या प्रकारामुळे शिखर मानसिक तणावाखाली होता आणि याच त्रासातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
वडिलांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अजय कुमार भाटियाविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. धमकी आणि पैशांच्या मागणीसंदर्भातील आरोपांची तपासातून पडताळणी केली जाणार आहे.