सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेतील घटनेनंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची भेट; दोषींवर कारवाई आणि २५ लाखांच्या मदतीसाठी ग्रामस्थांची मागणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. राणू कृष्णा हलामी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरी जाण्याची इच्छा व्यक्त करूनही तिला सुट्टी दिली नाही, असा गंभीर आरोप तिच्या पालकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्रमशाळेच्या वसतिगृहात राणूने पंख्याला गळफास घेतल्याची घटना घडली. राणूची तब्येत ठीक नसल्याने तिने घरी जाण्याचा आग्रह धरला होता, असे तिच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे. मात्र, तिला घरी जाण्याची परवानगी देण्याऐवजी खोलीत बंद करून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या आरोपांची चौकशी होऊन सत्य समोर यावे, अशी मागणी होत आहे.
राणू ही सोनसरी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत निवासी राहून आपले शिक्षण पूर्ण करत होती. आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या राणूला नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी तिचे आई-वडील भेटण्यासाठी खास मोहगाववरून आले होते. त्यांनी राणूची भेट घेऊन तिची विचारपूस केली, शिक्षकांशीही संवाद साधला. आई-वडिलांच्या भेटीने राणूच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. काही वेळ गप्पा मारल्यानंतर आई-वडिलांनी तिचा निरोप घेतला व ते घराच्या दिशेने परत निघाले. मात्र, पालक घरी पोहोचलेही नाही तोच त्यांना मुलीने आत्महत्या केल्याचा निरोप गेला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यासोबतच राणूच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सोनसरी येथील आश्रमशाळेला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी राणूच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि तपासात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
गडचिरोली जिल्ह्यात यापूर्वीही आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूची गंभीर घटना घडली होती. धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत १० ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. शासनानेही या प्रकरणाची दखल घेत संबंधित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांसह संचालकांवर कारवाई केली होती.
या सर्पदंश प्रकरणात पोलिसांनी कठोर कायदेशीर पाऊल उचलले. संस्थेचे अध्यक्ष आणि माजी खासदार मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांच्यासह शाळेतील एकूण पाच जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनसरी येथील ताज्या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, आरोग्यविषयक तक्रारींकडे प्रशासनाचे लक्ष आणि जबाबदारी निश्चित करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.