विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा, शिक्षकांची पदे सुरक्षित ठेवा; विज्युक्टाचे शिक्षण विभागाला निवेदन
नागपूर (Student Portal Over Age) : शासनाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून अकरावीत प्रवेश घेतलेले नियमित विद्यार्थी बारावीत आल्यानंतर स्टुडंट पोर्टलवर ‘ओव्हर एज’ दाखवून त्यांची नावे दिसत नसल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक मोठ्या महाविद्यालयांतील ३० ते ३५ नियमित विद्यार्थ्यांना या तांत्रिक त्रुटीचा फटका बसत आहे. परिणामी, बारावीचे बोर्ड परीक्षा अर्ज भरण्यात अडचणी येत असून, पोर्टलवरील विद्यार्थीसंख्या कमी दिसल्याने संचमान्यतेवरही परिणाम होत आहे. वर्ग व तुकड्यांच्या मान्यतेवर परिणाम होऊन शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
या (Student Portal Over Age) प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांच्यामार्फत मा. शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक आणि शिक्षण सहसंचालक यांना निवेदन सादर करण्यात आले.
शेकडो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न
शासनाच्या अधिकृत ऑनलाइन प्रक्रियेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे केवळ वयाच्या निकषामुळे पोर्टलवर दिसत नसतील, तर त्याचा परिणाम त्यांच्या बोर्ड परीक्षा अर्जांवर आणि महाविद्यालयांच्या संचमान्यतेवर होऊ शकतो. पोर्टलवरील नोंदींमुळे नियमित विद्यार्थ्यांची संख्या कमी दर्शविली गेल्यास शिक्षकांच्या पदांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ही समस्या कायम राहिल्यास महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती विज्युक्टाने व्यक्त केली आहे.
निवेदनावर सकारात्मक चर्चा; प्रश्न शिक्षण आयुक्तांपर्यंत पोहोचविणार
शिक्षण उपसंचालक सौ. माधुरी सावरकर यांच्यासोबत निवेदनातील मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या आणि महाविद्यालयांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून हा प्रश्न शिक्षण आयुक्तांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
विज्युक्टाची मागणी आहे की, स्टुडंट पोर्टलवरील ‘ओव्हर एज’ची तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून नियमित विद्यार्थ्यांची नावे पूर्ववत नोंदवावीत, बारावीचे बोर्ड परीक्षा अर्ज भरण्याची अडचण दूर करावी आणि संचमान्यतेसाठी या विद्यार्थ्यांची योग्य गणना करावी. यासोबतच निवेदनावरील चर्चेदरम्यान शिक्षकांच्या e-KYC आणि नियुक्ती दिनांकातील दुरुस्तीच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांचा प्रवेश आणि परीक्षा देण्याची संधी सुरक्षित राहणे, तसेच नियमित विद्यार्थीसंख्येअभावी शिक्षकांवर अन्याय होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी विज्युक्टाने केली आहे.
निवेदनप्रसंगी उपस्थित
विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवेदनप्रसंगी के. का. सहसचिव डॉ. अभिजीत पोटले, नागपूर ग्रामीण अध्यक्ष डॉ. नितीन देवतळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रवीण चटप, प्रा. बागडे, चंद्रपूरचे प्रा. नामदेव मोरे, नागपूर शहराध्यक्ष डॉ. चेतन हिंगणेकर यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.