अंजनगावसुर्जी (Bangladeshi Rohingya) :- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफार्म ‘X’वरुन मालेगावनंतर अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी येथे बांगलादेशी (Bangladesh) रोहिंग्याना तहसीलदारांनी जन्म दाखले दिल्याचा आरोप केल्याने अंजनगाव सुर्जी शासकीय व प्रशासकीय यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे.
तहसीलदारांनी दिले ११०० रोहिंग्यांना रहिवाशी दाखले
याबाबत तहसील कार्यालयात गेल्या सहा महिन्यात झालेल्या सर्व प्रकरणांची तपासणी सुरू करण्यात आली तथा राज्य गुप्तवार्ता पथके तहसील कार्यालयात दाखल झाल्याने या शोधमोहिमेत काय समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असताना ११०० रोहिंग्यांना दाखले दिल्याच्या वक्तव्यामध्ये तथ्य किती? हा प्रश्न निर्माण झाला आहे. अंजनगावसुर्जी येथे बांगलादेशी रोहिंग्यांना येथील तहसीलदारांनी जन्मदाखला देण्याचे आदेश दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somayya) यांनी केल्याने गुरूवार सकाळपासूनच शहरात चर्चाना पेव फुटले आहे.
रोहींग्या प्रकरणात दै. ‘देशोन्नती’ प्रतिनिधीने माहिती घेतली असता यात एका अल्पसंख्याक समाजाच्या महिलांनी व पुरुषांनी दाखले मागण्यांचे अर्ज दाखल केले आहेत व त्यांची पुष्टीसुद्धा होते. तर काही संशयित (Suspect) अर्जही असून त्यांचे सखोल चौकशी केल्यावरच ते रोहींग्या की भारताचे नागरिक, हे स्पष्ट होणार असून ११०० रोहिंग्याना प्रमाणपत्र दिले, हे आज रोजर्जा तरी आततायी केलेले वक्तव्य ठरत आहे.
तहसील कार्यालय लागले कामाला
या प्रकरणाची शहनिशा केली असता आतापर्यंत जन्म नोंदणीचे ५६९ आदेश करण्यात आले असून त्यात ४८५ आदेश हे मुस्लीम समाजाच्या नागरिकांचे असून ८४ आदेश हे हिंदू समाजातील (Hindu society) आहेत आणि सुमारे हजाराच्या घरात प्रकरणे अजूनही पेंडींग आहेत. आदेश झालेली सर्व प्रकरण नियमाने कागदपत्रांची पूर्तता केलेली प्रकरण असून आता या प्रकरणातील सादर कागदपत्र बोगसपणे बनवली आहेत काय?
याबाबत तपासणी करण्यात येऊन यात जोडलेले शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, नगरपालिका वा ग्रामपंचायत यांच्याकडून देण्यात आलेले नोंद नसल्याचे प्रमाणपत्र व इतर तत्सम कागदपत्र तपासणी करण्यात येणार आहे, असे तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार स्पस्ट झाले आहे. तत्पूर्वी बांग्लादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले दिल्याच्या आरोपानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून यासंदर्भात एसआयडी गुप्तवार्ता विभागाचे अधिकारीही दाखल झाले आहे.