कोसमतोंडी-सातलवाडा-विर्शी मार्गावर अपघातात वाढ
सडक अर्जुनी/गोंदिया (Arjuni Accident) : तालुक्यातील कोसमतोंडी-सातलवाडा-विर्शी मार्गावरील कोसमतोंडी ते हेटी या ५ किमी रोडाचे बांधकाम ४-५ महिन्याआधी करण्यात आले. पण डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजुची मुरूमाने सायडींग भरण्यात आली नाही. त्यामुळे (Arjuni Accident) रस्ता अपघातप्रवण ठरला आहे. रस्त्यावरून धावणारे वाहन अंदाज येत नसल्याने रस्त्याखाली उतरुन अपघातग्रस्त होत आहेत. याकडे साबां विभाग व उपविभागीय बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मोठ्या अपघातानंतरच विभागाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मोठ्या अपघातानंतरच विभागाला जाग येणार का?
कोसमतोंडी-सातलवाडा-विर्शी मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र रस्ता तयार करताना दोन्ही बाजुने रस्त्याच्या कडे (बाजु) भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर रहदारी करताना कमालीची कसरत करावी लागते. ‘नजर हटी की दुर्घटना घटी’ अशी म्हण स्मरणात ठेवून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. सदर मार्ग गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा आहे. या (Arjuni Accident) मार्गावर रात्रंदिवस वाहनाची रेलचेल असते. तसेच साकोली आगारावरून बससेवा सुरू आहे. सदर मार्गाचे डांबरीकरणाचे काम झाल्यानंतर कंत्राटदाराने रोडाची दोन्ही बाजूची सायडींग न भरता रोडाचे बाजूची माती काढून सायडींग भरून लिपापोती केली. यामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात यापुर्वीही वृत्त प्रकाशित करून विभागाचे लक्ष वेधण्यात आले. परंतु, झोपेत असलेले अधिकारी मोठ्या अपघातानंतरच जागे होणार? असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दररोज होताहेत अपघात
सदर रस्त्यावर ट्रक व बसची क्रासिंग होताना साकोली आगाराची बस चिचटोला ते बेहळीटोला दरम्यान रस्त्याच्या कडेला उतरून चिखलात फसली. अडकलेली बस चिखलातून काढण्यासाठी दुसरी बस आणण्यात आली. पण तरीसुद्धा बस निघाली नाही. (Arjuni Accident) दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने बस काढण्यात आली. चालकाच्या समयसुचकतेने प्रवासी मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठा अपघात घडला असता. तसेच दुसर्या दिवशी चारचाकी वाहन फसले. या चारचाकी वाहनाला ट्रॅक्टरचे सहाय्याने काढण्यात आले. सुदैवाने दोन्ही अपघातात कोणतीही अनुचीत घटना घडली नाही. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्षितपणा मोठ्या अपघाताला निमंत्रण देणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.