भिवापूर (Nagpur) :- थकित वेतन देयके शालार्थ प्रणाली मध्ये आँनलाईन सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी दिले. यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतू सहा जिल्ह्यातील शेकडो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे थकित वेतन देयके एकाच वेळी असल्याने शालेय प्रणाली मध्ये आँनलाईन करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आँनलाईन(Online)करण्याची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनेनी केली आहे.
मुदत वाढवून देण्याची मागणी
थकित वेतन देयके शालार्थ प्रणाली मध्ये आँनलाईन पध्दतीने सादर करण्याचे नागपूर, वर्धा,भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या सहा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व अधिक्षक वेतन (Superintendent Salary) पथक यांना शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार शालार्थ प्रणाली मध्ये थकित वेतन देयके आँनलाईन सुविधा 11सप्टेंबर पासून विकसित करुन देण्यात आली आहे. थकित वेतन देयके आँनलाईन सादर करण्यासाठी 25 सप्टेंबर मुदत दिली आहे. या तारखेनंतर थकित वेतन देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही अशी ताकीद दिली आहे. परंतु सहाही जिल्ह्यातील शाळेतील शेकडो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे थकित वेतन सादर करायचे असल्यामुळे आँनलाईन प्रणाली मध्ये अडचणी येत आहेत. तसेच वारंवार प्रक्रिया बंद पडत असल्याने शाळेतील कर्मचाऱ्यांचे थकित देयके सादर करता येत नाही. त्यामुळे वेतन देयके सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनेनी केली आहे.