परभणीतील पाथरी तालुक्यातील उमरा शिवारातील घटना
सुदैवाने जीवीतहानी नाही
परभणी/पाथरी (Cotton Fire) : शेतातील घरात साठवुन ठेवलेल्या कापसाला अचानक आग लागली. या आगीमध्ये संसारोपयोगी साहित्यासह ४५ क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना सोमवार २३ डिसेंबर रोजी रात्री पाथरी तालुक्यातील उमरा शिवारात घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. कापूस जळाल्याने शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सदर घटनेविषयी (Cotton Fire) अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गौंडगाव येथील शेतकरी श्रीधर नारायण कोल्हे यांची उमरा शिवारातील गट क्रमांक १०८ मध्ये शेती आहे. या ठिकाणी असणार्या पत्र्यांच्या खोल्यांमध्ये त्यांनी शेतातील ४५ क्विंटल कापूस साठवुन ठेवला होता. शेतात कुटूंब राहत असल्याने या ठिकाणी संसारोपयोगी साहित्य देखील होते. सोमवार दिवसभर शेतात राहिल्यानंतर सदर शेतकरी कुटूंबासह गावाकडे गेले.
रात्रीच्या वेळी अचानक आग लागली. या (Cotton Fire) आगीत पत्राच्या खोल्यांमध्ये ठेवलेला कापूस व इतर साहित्य जळून खाक झाले. सोमवारी सकाळी शेतात गेल्यावर सदर बाब शेतकर्याच्या लक्षात आली. कापूस जळाल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे.