निवडणुकीत वापरासाठी कोऱ्या करकरीत नोटांचे बंडल परभणीतील गंगाखेडात आल्याची चर्चा
परभणी/गंगाखेड (Assembly Elections 2024) : कोट्यावधी रुपयांच्या शंभर व पाचशे रुपयांच्या नोटा बंडल मधून काढून घेत बंडलचे पॅकिंग कव्हर रस्त्यावर फेकल्याचे चित्र गंगाखेड ते परभणी जाणाऱ्या रस्त्यावर महातपुरी शिवारात पहावयास मिळत असून विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2024) वापरासाठी कोऱ्या करकरीत नोटांचे बंडल गंगाखेड तालुक्यात आल्याची चर्चा नागरिकांत होत आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल आले असतांना ही निवडणूक विभागाने स्थापन केलेले पथक करतात तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
निवडणूक काळात पैशांच्या अति वापरामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात (Assembly Elections 2024) सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होणार असल्याची व या मतदार संघातून निवडणूक लढाविणारे उमेदवार आपल्या विजयासाठी वाटेल ते करत मोठ्या प्रमाणात वापर करणार असल्याची चर्चा होत असतांनाच रविवार १० नोव्हेंबर रोजी गंगाखेड परभणी रस्त्यावर मिळून आलेल्या नोटांच्या पॅकिंग बंडल च्या कव्हर मुळे या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
गंगाखेड परभणी रस्त्यावर सापडलेल्या नोटांच्या दहा बंडलच्या पॅकिंग प्लास्टिक कव्हरवर सी. एन. पी. नाशिक (करंसी नोट प्रेस नाशिक) असे लेबल मिळून आले. या लेबलवर नोटेची किंमत ५०० रुपये, नोटांची संख्या १०००, टोटल नोटांची किंमत, प्रेफिक्स क्रमांक, १००० नोटांचा सिरीयल क्रमांक, १० बंडलच्या पॅकेटचा पॅकिंग दिनांक व वेळ असा उल्लेख आहे तर काही शंभर नोटांच्या बंडल पॅकिंग पट्टीवर संख्या पटल में स्टार सहित बिना क्रमानुसार संख्या वाले नोट असा उल्लेख आहे.
रस्त्यावर फेकलेले कोट्यावधी रुपयांच्या नोटांचे पॅकिंग कव्हर हे निवडणूक (Assembly Elections 2024) कामासाठी वापरलेल्या नोटांचेच असल्याची चर्चा नागरिकांतून होत असून एव्हढ्या मोठ्या प्रमाणात नोटांच्या बंडलांचे पॅकिंग कव्हर तसेच सील पट्ट्या रस्त्यावर फेकलेल्या अवस्थेत मिळून आल्याने निवडणूक काळात होत असलेल्या पैसे वाटप व अन्य गैर प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने जिल्ह्याच्या सीमेवर तसेच संपूर्ण मतदार संघात कार्यरत केलेली विविध पथके करतात तरी काय असा प्रश्न सुज्ञ नागरिकांतून उपस्थित केला जात असून निवडणूक निरीक्षक यांच्यासह निवडणूक विभागातील अनेक वरिष्ठ निवडणूक काळात मतदार संघात येतात आणि कागदोपत्री आढावा घेऊन जातात मात्र जमिनी स्तरावर होणारे असले गैर प्रकार त्यांच्या निर्दर्शनास का येत नाही असे ही नागरिकांतून बोलल्या जात आहे.