शालेय विद्यार्थ्यांकडून मतदान करण्याचा पालकांना आग्रह
हिंगोली (Assembly General Election) : जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत (Assembly General Election) मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप समितीमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात येत आहे. या संकल्प पत्रातून विद्यार्थी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आग्रह करणार आहेत. आपल्या पालकांकडून मतदान करण्याचा संकल्प करून घेणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना संकल्पपत्र वितरित करण्यात आले आहेत. 26 ऑक्टोबरपर्यंत हे संकल्प पत्र विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जमा करून देणार आहेत.
पालक संकल्प पत्र वाचून त्यावर स्वाक्षरी करणारा आणि मतदान करण्याचा संकल्प करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात (Assembly General Election) मतदारांनी मतदान करून लोकशाहीला अधिक भक्कम करण्यासाठी आपले योगदान द्यावे, यासाठी स्वीप समितीमार्फत मतदार जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. निवडणुकीच्या संदर्भाने यावेळी बहुसंख्य मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, मतदारांमध्ये आपल्या मतदानाबाबत जागरूकता निर्माण होऊन जिल्हाभरात मतदानाची एकूण टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा स्विप समिती तसेच वसमत, कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा स्तरावरील स्विप समिती वेगवेगळे उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावर मतदारांमध्ये जागृती निर्माण करत आहे.
जिल्हाभरातून विधानसभानिहाय (Assembly General Election) सर्वात जास्त संकल्पपत्र भरून देणाऱ्या पहिल्या तीन केंद्रप्रमुखांचा जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीच्या प्रमाणपत्राने गौरव देखील करणार आहेत. यामुळे अधिक संकल्पपत्र भरून देण्यासाठी केंद्रनिहाय चुरस निर्माण झाली आहे. जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबवून प्रत्येक मतदाराला मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वीप समिती प्रयत्नशील आहे. यापुढील काळात मतदार जनजागृतीसाठी चुनाव पाठशाला, आशा ताई, बालवाडी अंगणवाडी ताई, महिलाबचत गट, बीएलओ इत्यादीमार्फत प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी गृहभेटीचे आयोजन करण्यात येणार आहे, असे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी प्रशांत डिग्रसकर व संदीपकुमार सोनटक्के यांनी कळविले आहे.