मुंबई(Mumbai):- आज दुपारी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सत्ताधारी मराठा – ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. सरकारने बोलावलेल्या बैठकीला विरोधक का आले नाहीत, या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाने विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
सत्ताधारी आक्रमक… विरोधक बॅफूटवर
यावरून विधानसभा (Assembly) सभागृह तिसऱ्यांदा तहकूब झाले. सुरवातीला दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी, त्यानंतर 12 वाजून 23 मिनिटांनी 10 मिनिटांसाठी आणि दुपारी 12 वाजून 37 मिनिटांनी 45 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण द्यायचे की नाही याविषयी विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी अशी सत्ताधाऱ्यांची मागणी करीत होते. आशिष शेलार, संजय कुटे, संजय गायकवाड, अमित साटम यावेळी आक्रमक झाले. सत्ताधारी पक्ष वेल मधे आला. सत्ताधाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत विरोधक का आले नाहीत? त्यांना कोणाचा मेसेज आला होता? बोलवता धनी कोण? आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या (suicide)केली त्यावेळी सरकार कोणाचे होते? कोणत्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलीने मराठा आरक्षणाला विरोध केला होता? समाजात तेढ निर्माण होत असताना विरोधक बैठकीला का गेले नाहीत? विरोधकांचा नकली चेहरा महाराष्ट्रतील जनतेसमोर आला पाहिजे. असे प्रश्न आणि मागणी सत्ताधारी करीत होते.
विरोधी पक्ष पूर्णपणे हतबल
यावेळी विरोधी पक्ष पूर्णपणे हतबल झालेला दिसला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) बोलण्याचा प्रयत्न करीत होते मात्र सत्ताधारी सदस्यांनी घोषणा देऊन त्यांचे बोलणे हाणून पाडले. कालची विरोधकांची अनुपस्थिती सत्ताधाऱ्यांना चांगलीच जीव्हारी लागली असून विरोधकांना कोंडीत पकडण्याचे काम सुरू झाले आहे. विरोधकांचे काल बैठकीला न जाण्याची भूमिका त्यांच्यावर उलटली असल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे. दरम्यान, कामकाज दीड वाजता सुरू झाल्यानंतर परिस्थीत काय वळण घेते इकडे राज्याचे लक्ष लागले आहे.