माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन
वलांडी हसन (Diliprao Deshmukh) : मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखानदारी हा धंदा म्हणून न करता सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्याचे हित जोपासण्यासाठी म्हणून कारखानदारी चालवीत आहोत. यामुळेच डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार हा संपूर्ण मांजरा परिवाराचा आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) यांनी केले.
द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे या संस्थेचा साखर उद्योग गौरव पुरस्कार नुकताच माजी मंत्री दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) यांना देऊन गौरविण्यात आले. याबद्दल निलंगा मतदार संघाच्या वतीने दिलीपराव देशमुख यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन वलांडीत करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार त्रिंबक भिसे, खासदार शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्लिकार्जुन मानकरी हे होते. व्यासपीठावर अशोक पाटील निलंगेकर, बसवराज पाटील नागराळकर, यशवंतराव पाटील, अभय साळुंखे, डाॕ. अरविंद भातांब्रे, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, सरपंच राणीताई भंडारे, विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील, अजित बेळकोने, सुधीर मसलगे, सुतेज माने, अजित नाईकवाडी, अशोक कोरे, जावेद तांबोळी, इस्माईल लदाफ, मदन बिरादार, व्यंकटराव हंद्राळे, अविनाश रेशमे, भागवत वंगे, शरण लुल्ले, अमर मुर्के, सुनील नाईकवाडी, सतीश शिवने, दीपक स्वामी, आरती भंडारे, अयोध्या पेठकर, प्रेरणा जाधव, मीनाताई बंडले, करुणा पारशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘आम्ही चुलते पुतणे एक नाहीत…’
नागराळकर साहेब, तुम्ही समजता तसे नाही… आम्ही चुलते पुतणे एक नाहीत… तसे असते तर एकमेकांच्या विरोधात थांबलो असतो का? असा सवाल करीत अशोक पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघातील ‘चुलते व पुतणे एकच आहेत’, ही चर्चा खोडून काढली. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यामुळे या भागांमध्ये आम्हाला सिंचनाच्या सोयींसह अनेक कामे करता आली, याचा आम्हाला अभिमान असल्याचेही निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.
निलंग्याचे नेतृत्त्व करावे…
दरम्यान निलंगा मतदारसंघातील सर्व इच्छुकांच्या समोरच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांनी आपणाला सत्काराला बोलावल्याबद्दल आभार मानले दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) यांनी वैयक्तिक रित्या निलंगा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे या मतदारसंघाची जबाबदारी घ्यावी व नेतृत्व करावे अशी जाहीर भावनाही नागराळकर यांनी यावेळी व्यक्त केली त्याला उत्तर देताना आपल्या भाषणात दिलीपराव देशमुख यांनी आपण कोणतीच निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट केले.