हिंगोली शहरातील घटना, वीज कंपनीच्या थकीत देयके वसुलीसाठी होती व्हीसी
हिंगोली (Mahavitaran VC) : नांदेड विभागांतर्गत वीज कंपनीच्या थकीत देयके वसुलीसाठी (Mahavitaran VC) मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरस सुरू असताना त्या दरम्यान हिंगोली ग्रामीणचे सहाय्यक अभियंता सचिन कोळपे यांचा मृत्यू झाला.
नांदेड विभागांतर्गत नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातील व्हिडीओ कॉन्फरस नांदेड मुख्य अभियंत्याकडून १ ऑक्टोंबर रोजी घेतली जात होती. दुपारच्या सुमारास व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू झाली. त्यामध्ये तिनही जिल्ह्यातील अभियंते व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. थकीत वीज देयके वसुलीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू असतानाच हिंगोली ग्रामीणचे सहाय्यक अभियंता सचिन दत्तात्रय कोळपे (३५) हे अचानक खुर्चीवरून खाली पडले. यावेळी उपस्थित अधिकार्यांनी त्यांना तात्काळ खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेते असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
सचिन कोळपे यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परीवार आहे. सचिन कोळपे हे नांदेड येथील रहिवाशी असल्याचे महावितरणच्या (Mahavitaran VC) सुत्रांनी सांगितले. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काही वेळ शवविच्छेदन थांबविले. मयत सचिन कोळपे यांचा मृतदेह दुपारी २.३० वाजता जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आला. ३ वाजता त्यांच्या पत्नीसह त्यांचे अनेक नातेवाईक आले; परंतु नातेवाईकांनी सचिन कोळपे यांच्या मृत्यूप्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांवर गुन्हा दाखल करावा तोपर्यंत शवविच्छेदन करू नये अशी भूमिका घेतली होती. महावितरणच्या अनेक अधिकार्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. रात्री ६.४० वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सपोनि बनसोडे, संजय मार्के, अशोक धामणे, संतोष करे, संभाजी लकुळे, अमजद शेख, धनंजय क्षीरसागर, गणेश लेकुळे यांचे पथक तळ ठोकून होते.