परभणी/गंगाखेड(Parbhani/Gangakhed):- सुमारे नऊ वर्षांपूर्वी दुसऱ्या जातीतील तरुणाने चुलत बहिणीला पळवून नेत तिच्यासोबत लग्न केल्याचा राग मनात धरून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्या तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक २६ एप्रिल शुक्रवार रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोद्री येथे घडली आहे. याप्रकरणी रविवार रोजीच्या पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील महानंदा या तरुणीने गावातीलच धोंडीराम देवकते याच्यासोबत पळून जाऊन सुमारे नऊ वर्षांपूर्वी लग्न केले होते. दुसऱ्या जातीतील तरुणासोबत केलेल्या लग्नाला महानंदा यांच्या घरच्यांसह चुलत भावांचा विरोध होता. यावरून चुलत भाऊ (cousin)बाळू बालाजी लटपटे हा खूप चिडलेला होता व एक ना एकदिवस तरी धोंडीराम देवकते याचा काटा काढणार असे गावातील लोकांकडे म्हणत असल्याने पळून जाऊन लग्न केले.
तेंव्हापासून फिर्यादी व तिचा पती बाहेरगावी राहत होते. शिंगणापूर येथून परत आलेल्या गावातील कावडसमोर हलगी वाजविण्याचे निमंत्रण आल्याने दिनांक २६ एप्रिल शुक्रवार रोजी आम्ही गावात आलो. रात्री ९:३० ते १० वाजेच्या सुमारास गावातील हनुमान मंदिरासमोर कावड आली, तेंव्हा आम्ही कावडचे दर्शन घेत असताना व पती धोंडीराम देवकते हा कावड समोर हालगी वाजवित असताना चुलत भाऊ बाळू बालाजी लटपटे हा तेथे आला व जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याने लोखंडी कुऱ्हाडीने धोंडीराम देवकते यांच्या डोक्यात दोन वार करून गंभीर जखमी केले.
रक्तबंबाळ होऊन धोंडीराम देवकते पडला तेंव्हा मी गेलेल्या इज्जतीचा आज बदला घेतल्याचे सांगत शिवीगाळ केल्याची फिर्याद महानंदा धोंडीराम देवकते यांनी दिल्यावरून दिनांक २८ एप्रिल रविवार रोजी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात जिवे मारण्याच्या उद्देशाचे कलमासह अनुसूचित जाती जमाती संरक्षण प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.