Karanja :- येथील वन विभागाच्या कार्यालयात चोरट्यांनी कुलूप आणि कडीकोंडा तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती भोपळा लागला. ही घटना १५ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी जी. ए.जतकर यांनी शहर पोलिसात लेखी फिर्याद नोंदवली आहे.
चोरट्यांनी कार्यालयाच्या आत चोरीच्या उद्देशाने झाडाझडती घेतली
येथील स्व.प्रकाशदादा डहाके वन पर्यटन केंद्रात वन विभागाचे (Forest Department) कार्यालय असून, १८ ते २५ वर्षीय वयोगटातील अज्ञात चार चोरट्यांनी १५ जून रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. तत्पूर्वी, त्यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेराची (CCTV camera) दिशा वरच्या तोंडाची करून ठेवली होती. चोरट्यांनी कार्यालयाच्या आत चोरीच्या उद्देशाने झाडाझडती घेतली. पण त्यांच्या हाती काहीही लागले नाही. दरम्यान, सकाळी वनमजूर भारत मुळे यांना कार्यालयांत चोरीचा (Robbery) प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही बाब लिपीक चौधरी यांना तर त्यांनी घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी जी. ए.जतकर यांना दिली. त्यांनी याबाबत शहर पोलिस स्टेशनला कळवले.
त्यावरून पोहेका उमेशकुमार बिबेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये चोरीचा प्रयत्न झाला पण त्यामध्ये कुठलेही साहित्य अथवा दस्तावेज गहाळ झाल्याचे लक्षात आले नाही. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी जतकर यांनी शहर पोलिसात लेखी फिर्याद देऊन कारवाईची मागणी केली आहे.