फुग्यांना टोचण्यासाठी फिरताहेत म्हणे लातूरचे ‘पिनेकरी’
औसा (Ausa Assembly Elections) : महायुतीच्या तगड्या उमेदवाराला जोरदार चितपट करण्याच्या उद्देशाने दंड ठोकून मैदानात सेनापती आणला. मात्र भाटांची भूपाळी कानी पडल्याशिवाय सेनापतींचा ‘दिनकर’ उगवत नसल्याने अवघ्या सैन्याचे ‘दैन्य’ काही उठाउठी जात नसल्याचे चित्र औसा विधानसभा मतदारसंघात आहे. लोकसभा निवडणूक निकालाची ‘हवा’ भरलेले फुगे औशात उडविले जात असून या फुग्यांना टोचण्यासाठी लातूरच्या ‘पिना’ खिशात घेऊन काहीजण (Ausa Assembly Elections) औशातल्या महाविकास आघाडीत फिरत असल्याची चर्चा आहे. यंत्रणेबाबत पंजामध्ये पकडून पंचप्राणाने तुतारी फुंकली तरीही सेनापती काही ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत नसल्याने सैन्य अस्वस्थ आहे. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सैन्याची अस्वस्थता जाणतील का? याकडे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. मात्र पश्चिम भागात उजनी आणि मातोळ्याचे वस्ताद अद्याप मैदानात उतरायला तयार नाहीत. या वस्तादांना कासारशिरशीच्या गोदामातील ‘गुटखा’ दिल्याची चर्चा आता जोर धरत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काही प्रमुख नेतेही ‘रामराम’ करून बऱ्याच अंतरावर ‘स्थितप्रज्ञ’ झाले आहेत.
‘लय मज्जा आली त्या वक्ती…’ अशा पारावरच्या गप्पा मारत महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीच्या कथनात सध्या दंग झालेली दिसत आहे. या कथनावरच (Ausa Assembly Elections) विधानसभा निवडणूक आपल्याला अलभ्य लाभ होईल, असे दिवास्वप्न बाळगून सध्या या मतदारसंघात महाविकास आघाडीचा प्रचार सुरू आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालाची हवा भरलेला फुगा फोडण्यासाठी खिशामध्ये पिना घेऊन लातूरमधून माणसे औसा विधानसभा मतदारसंघात फिरत आहेत. महाविकास आघाडीच्या सैनिकांना या खिशातील पिना तिजैरीच्या चाव्या भासत असल्या तरी त्या ‘पिना’ होत्या हे मात्र फुगा फुटल्यानंतरच कळणार आहे.
‘एव्हरीबडी इज वर्क, बट नोबडी इज वर्क!’
‘गड्या आपला गाव बरा’, म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे (Ausa Assembly Elections) औसा विधानसभा मतदारसंघात पाहिले जाते. मात्र निवडणूक प्रचार सुरू झाल्यापासून या उमेदवाराच्या यंत्रणेत चैतन्य काही दिसून येत नाही. महाविकास आघाडीची मोट बांधणार कोण? हा खरा सवाल निर्माण झाला असून, ‘एव्हरीबडी इज वर्क, बट नोबडी इज वर्क!’ अशी अफलातून परिस्थिती निर्माण झाली आहे.