परभणी (Parbhani):- महाविकास आघाडी व महायुतीमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत (Elections)अनेकांनी बंडखोरी केली. आपले राजकीय भविष्य बनवण्याचा प्रयत्न झाला. परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर या दोन मतदारसंघात बंडखोरी करणारे शरद पवार(Sharad Pawar) गटाचे माजी आ. बाबाजानी दुर्राणी, शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान व काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीतील सुरेश नागरे यांना पराजयाचा सामना करावा लागला आहे. आता महायुतीचे सरकार स्थापन झाले असल्याने बंडखोर उमेदवार यांचे पुढील राजकीय भविष्य काय राहणार ? पक्षश्रेष्ठी कारवाई करते का त्यांना परत स्विकारते का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निवडणूकीत बंडखोरीनंतर जनमानसात चर्चा
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असून बंडखोरीचा पायंडा आता जिल्हा पातळीपर्यंत पोहोचला आहे. बंडखोरी केल्यानंतरही राजकीय पक्षांनी त्यांना परत पक्षात घेऊन काम करण्याची संधी दिल्याचा इतिहास आहे. मागील पाच वर्षांपूर्वी बंडखोरी करणार्यांनी परत त्याच पक्षात काम केल्यामुळे बंडखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे कारण असले तरी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी व महायुती स्थापन केल्यामुळेही बंडखोरी आता अटळ झाली आहे. एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या प्रकारामुळे पक्षनिष्ठा हा विषय कमी होत जाणार आहे, कारण प्रत्येकाला राजकीय संधी मिळावी असे वाटणे साहजिक आहे. परभणी जिल्ह्यातही पाथरी व जिंतूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या घोळात विधानसभा लढवण्याची राजकीय संधी जाणार असल्याने बंडखोरीचा झेंडा काहींनी फडकाविला.
महायुती मधील राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा विजय
त्यामध्ये पाथरी विधानसभेत माजी आ. बाबाजानी दुर्राणी (Babajani Durani)यांनी अजित पवार यांना सोडून शरद पवार यांच्याकडे विधानसभेत संधी मिळावी असा शब्द घेऊन प्रवेश केला. तर शिंदे शिवसेनेचे (shivsena)अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी मतदारसंघात कोट्यावधीची कामे केल्याने जनतेतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्या दोघांनाही पक्षाने संधी डावल्यामुळे बंडखोरी करून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. दुर्राणी यांनी अपक्ष तर सईद खान यांना रासपचा झेंडा घेतला. निवडणुकीत दोघांनाही चांगले मताधिक्य घेतले मतांच्या विभाजनाच्या गणितात महायुती मधील राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा विजय झाला. आज मतदारसंघात दोनही बंडखोर उमेदवार यांची चांगली ताकद निर्माण झालेली आहे.
सईद खान रासप सोबत कायम राहतील का ?
यांना पक्षातून काही कारवाई होईल असे वाटत नाही कारण पाथरी विधानसभा मतदारसंघात येणार्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माजी आ दुर्राणी व सईद खान यांची राजकीय पक्षांनाही गरज आहे आता हे दोघेजण कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे सईद खान रासप सोबत कायम राहतात का ? असा प्रश्न ओबीसी समाजाला पडला आहे. या समाजाने मोठ्या प्रमाणावर विधानसभेला मतदान खान यांना केले आहे. तर माजी आ दुर्राणी हे परत अजित पवार गटात जातात का ? अशी चर्चा होत आहे कारण शरद पवार गटाकडून त्यांना दिलेला शब्द पाळला नाही. याच पद्धतीने जिंतूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणीचे सुरेश नागरे यांनीही बंडखोरी केली ओबीसी मतांच्या आकड्यांवर त्यांनी स्वतःचे राजकीय भविष्य आजमावयाचा प्रयत्न केला. यश आले नाही पण चांगली मतदान त्यांना विधानसभा निवडणुकीत पडल्यामुळे त्यांचे जनमत चांगले असल्याचे दिसून आले.
नागरे यांनी पाच वर्षांपूर्वी २०१९ ला परभणी विधानसभेत अपक्ष निवडणूक लढवून काँग्रेस सोबत बंडखोरी केली होती परत त्यांनी २०२४ ला बंडखोरी करून वंचित कडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली दोन वेळा काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्यांना परत पक्षाची जबाबदारी देतात का ? याकडे काँग्रेसच्या एकनिष्ठ लोकांचे लक्ष लागले आहे. किंवा वंचित पक्षाचे बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात नागरे पुढे काम चालू ठेवतात, यावरील चर्चा होत आहे.