कवडीमोल जमिनीसाठी मोजले तब्बल ७० लाख
मुख्याधिकारी यांचा व्यवहार संशयास्पद?
मुख्याधिकारी यांचा व्यवहार संशयास्पद?
बाभुळगाव (Babulgaon Nagar Panchayat) : शहरामधून दररोज गोळा केला जाणारा कचरा साठवणूक व प्रक्रिया करण्याकरिता डम्पिंग ग्राऊंडची निर्मिती करण्याचे नगर पंचायतीने (Babulgaon Nagar Panchayat) ठरविले आहे. त्यासाठी गणोरी शेतशिवारात तीन एकर शेतजमीन खरेदी करण्यात आली आहे. मुख्य रस्त्या पासून लांब असलेल्या या कवडीमोल जमिनीसाठी तब्बल ७० लाख रुपये मोजण्यात आले.
या प्रकारामुळे मुख्याधिकारी यांचा जमीन खरेदी व्यवहार संशयास्पद असल्याच्या चर्चांना शहरात उधान आले आहे. डम्पिंग ग्राऊंडसाठी इतरही प्रस्ताव आले असताना बाभूळगाव नगर पंचायतने हीच जमीन खरेदी करण्याचा आटापिटा का केला?, कमी किमतीत जमीन मिळत असताना जमिन खरेदीसाठी तब्बल ७० लाख का मोजले?, मुख्याधिकारी यांचा इतकी महागडी जमीन खरेदी करण्या मागचा हेतू काय? अश्या अनेक प्रश्नांची चर्चा शहरात होत आहे.
नगर विकास विभागामार्फत (Babulgaon Nagar Panchayat) बाभुळगाव नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणावर पैसा येतो आहे. हा पैसा कसा जिरवला जावा याबद्दल विविध क्लुप्त्या अमलात आणल्या जात आहे. मनमानी पद्धतीने सध्या नगर पंचायतचा कारभार सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून या ‘तीन एकर- ७० लाख’ जमीन खरेदीच्या व्यवहाराकडे पहिले जात आहे. नगरपंचायत च्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे यांनी कचरा साठवणूक करिता बाभुळगाव-गणोरी रस्त्यावरून कॅनॉल द्वारे गेल्या नंतर बरीच आत मध्ये असलेली गट नं. ११४ हि तीन एकर जमीन खरेदी केली.
या जमिनीची खरेदी संबंधित शेतकर्याने सन २०२१ मध्ये फक्त ११ लाख रुपयात केल्याचे समजते. आजच्या घडीला त्या भागामध्ये २३ लाख रुपये एकराची कोणतीही जमीन नाही व तशी खरेदी ही आतापर्यंत या भागातून झालेली नाही. सदर जमिनीचे मूल्यांकन अत्यल्प असताना व आजचे बाजार भाव प्रती एकर पाच ते सात लाख रुपये असताना ही तीन एकर जमीन जास्तीत जास्त २१ लाख रुपयात सहज पणे मिळाली असती, परंतु तीन एकर शेताचे नगरपंचायतीने सत्तर लाख रुपये का दिले? हा संशोधनाचा विषय आहे. या व्यवहारा संबंधात शहरात बरीच चर्चा रंगत आहे.
पैशाच्या उधळपट्टीवरून नागरिकांचा संताप
नगरपंचायतीने (Babulgaon Nagar Panchayat) ७० लाखाला घेतलेल्या शेतामध्ये जाण्याकरिता कॅनॉलच्या भिंतीवरून जावे लागते. त्यातही पुढे मोठा खोलगट भाग आहे. रस्ता नसलेले शेत कचरा साठवणुकी करिता खरेदी केल्याने सदर शेतात पोचता येत नसल्याने तेथे रस्ता तयार करण्या करिता किमान एक कोटी रुपये खर्च येईल असे शेजारील शेतकर्यांचे मत आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणावर पैसा येत असला तरी तो पैसा अशा पद्धतीने जिरवण्यासाठी नाही, अश्या शब्दात पैशाच्या उधळपट्टीवरून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
‘दाल में कुछ काला है- या पुरी दालहि काली है?
इतरही शेतकरी आपले शेत अल्प किमतीत द्यायला तयार असताना (Babulgaon Nagar Panchayat) नगरपंचायतीने हीच जमीन खरेदी करण्यामध्ये काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगर पंचायतीने जमिनी संदर्भात जाहिरात काढल्यानंतर अनेक नागरिकांनी अर्ज केले. आपले शेतही मुख्याधिकार्यांना दाखवले, मात्र मुख्याधिकारी यांना हेच शेत का पसंत आले?, जमीन ७० लाख रुपयाला नगरपंचायतीला खरेदी करण्याचा मोह का झाला असावा? या प्रकरणात ‘दाल में कुछ काला है- या पुरी दालहि काली है?’ अशी खमंग चर्चा आता होत आहे.