आंबोडा येथील सभेस उपस्थित राहण्याची ग्वाही
मानोरा (Bachu Kadu) : तालुक्यातील सोयजना ग्राम पंचायतने बच्चू कडू यांच्या सात – बारा कोरा पद यात्रेला ग्रामपंचायतचा ठराव घेऊन पाठिंबा दर्शविला आहे. सुपर्ण गाव १४ तारखेला आंबोडा येथील सभेस हजर राहणार अशी ग्वाही बच्चू कडू (Bachu Kadu) यांना सरपंच सौ. दिव्या अजय चव्हाण ग्रामपंचायतचे पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन दिली आहे.
महायुती सरकारने आमचा अंत पाहू नये असे सरकारला प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सात बारा कोरा यात्रेला २१ किमीचा प्रवास करत उंबर्डा बाजार येथे यात्रेचा पहिला मुक्काम ठरला. त्याच ठिकाणी सभा घेत सातबारा कोरा होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वप्रथम स्व. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापळ येथून ही यात्रा उत्साहात सुरु झाली. २१ किमीचा प्रवास करत यात्रेकरू दिवसभर पावसाशी झुंज देत गावोगाव मागे टाकत भर पावसात पुढे निघाले. ठिकठिकाणी लोक ७/१२ कोरा यात्रेचे स्वागत करत शेकडोच्या संख्येने सोबत जुळत आहे.
विधानसभा निवडणुक काळात दिलेला आश्वासन फक्त भाजप व मित्र पक्षाने शेतकऱ्याचे मत मागण्यासाठीच शेतकऱ्यांचा वापर केला असे बोलून त्यांनी सरकार वर टीका केली. जो पर्यंत शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकार पूर्ण करणार नाही, तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही. शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशीला योग्य हमीभाव सरकारने द्यावा व गरीब कुटूंबाला घरकुलाची रक्कम वाढून द्यावी, आत्महत्या केलेल्या कुटुंबातील व्यक्तीच्या मुलांना मोफत व दर्जेदार शिक्षण द्यावे तसेच शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करावा अशा अनेक मागण्या त्यांनी भाषणात सांगितले.
शेतकऱ्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. दिलेल्या कालावधीत सरकारने मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू असे म्हणत फडणवीस सरकार वर टीका केली. हा यात्रेचा फक्त पहिला टप्पा असून आणखी महाराष्ट्र भर २ हजार किलोमीटर यात्रा पायदळ फिरून शेतकऱ्यांना एकजुट करू व सरकार विरोधात तीव्र आंदोलन करू असे जाहीर सभेत सागितले.
मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावे!
शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी शेतमजूर सह तालुका महागाव आंबोडा येथे यात्रेचा समारोप १४ जुलै रोजी होणार आहे. या पदयात्रेत सहभागी होऊन सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रहार सेवक शाम पवार व चेतन पवार यांनी केले आहे.




