बहिरम यात्रेत शंकरपटाचा थरार,लाखो प्रेक्षकांची गर्दी
तीन दिवसात ४०० बैलगाडा शर्यतीत
तीन दिवसात ४०० बैलगाडा शर्यतीत
चांदुरबाजार (Bachu Kadu) : विदर्भातील सर्वात मोठी यात्रा असणाऱ्या बहिरम बाबा यात्रा महोत्सवात (Bahiram Baba Yatra Festival) प्रहार जनशक्ती पक्षाच्या (Prahar Jan Shakti Party) वतीने आयोजित विदर्भ केसरी शंकरपटाचा गुरुवारी समारोप झाला. या समारोपीय कार्यक्रमादरम्यान शंकरपटाच्या शर्यतीत बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी सुद्धा आपला बैलगाडा हाकला आणि चक्क ६.९९ सेकंदात बच्चू कडू यांनी ही शर्यत जिंकली विशेष म्हणजे बच्चू कडूंचा बैलगाडा आणि भाषण दोन्हीही यावेळी सुसाट होते. लाखो प्रेक्षकांनी या शंकरपटाचा थरार अनुभवला.या शंकरपटात तब्बल चारशे धुरकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
बहिरम येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या (Prahar Jan Shakti Party) वतीने दि.२१ ते २३ जानेवारी दरम्यान जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी या शंकरपटाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम होता. याप्रसंगी शेवटच्या दिवशी लाखो प्रेक्षक,शेतकरी बांधव हा शंकरपट बघण्यासाठी उपस्थित झाले होते. यावेळी बच्चू कडू यांनी गोविंदा व शिवा ही बैलजोडी घेऊन बैलगाडा शर्यतीत भाग घेतला आणि ६.९९ सेकंदाच्या वायुवेगाने ही बैलजोडी धावली आणि ही शर्यत जिंकली. (Bachu Kadu) बच्चू कडू यांच्या बैलजोडीने शंकरपटात धुराळा तर उडविलाच मात्र त्याहीपेक्षा कडू यांच्या भाषणबाजीने विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारे सुसाट भाषण करून अवघे विरोधक शांत करून टाकले.
लाखो जनसमुदाय, शेतकरी आणि प्रेक्षकांना संबोधित करतांना माजी मंत्री बच्चू कडू (Bachu Kadu) म्हणाले की,ही 56 इंचाची छाती नाही तर शेतकऱ्यांच्या मुलाची छाती आहे, बैल जोडी आवरत नव्हती इतकी सुसाट पळाली.हम चलते तो चिता की रफ्तार से चलते. रोकने की तुम्हारी औकात नही थी, तुम्ही बेइमानी केली म्हणून मी हरलो हे मतांचे चोर आहे.थांबविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी बच्चू कडू थांबत नाही, आणखी ताकदिने आम्ही धावणार शेतकरी व शेतमजुरांसाठी आम्ही लढतोय तर आमचं प्रत्येक रक्त हे शेतकऱ्यांसाठी आहे असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर नयना बच्चू कडू (Bachu Kadu) यांचेसह संतोष कीटूकले,सुरेश गणेशकर, राजेश सोलव, सचिन सोलव, विशाल चौधरी, राजेंद्र येऊल, सतीश मोहोड, विनोद राऊत,संजय धिंगरे,दीपक धोंगडे, प्रवीण पाटील, बल्लू जवंजाळ, विशाल बंड, विशाल आवारे, मनोज देशमुख,नंदू विधळे, राजाभाऊ जामोदकर, निलेश वाटाणे, उद्धव ठाकरे,राजन शेळके, भैय्यासाहेब ठाकरे, विलास बुरघाटे, अशोक पाताळवंशी, रोशन चौधरी, अजिंक्य चौधरी, अभिषेक सातपूते,विशाल पांडे,अजिंक्य चिखले, प्रशांत आवारे, शुभम जवंजाळ, विवेक ठाकरे, मनोज नंदवंशी, मिलिंद कार्लेकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.अंकुश जवंजाळ यांनी या शंकरपटाचे नियोजन सांभाळले होते.
देवाभाई, महिप्या जोडीने पटकावले प्रथम बक्षीस
अतिशय रंजक आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या शंकरपटात जांभळी येथील मोहसीन पटेल यांच्या देवाभाई महिप्या या जोडीने ‘अ’ गटात प्रथम क्रमांक पटकावला.६.४९ सेकंद वायुवेगाने अंतर कापत ही बैलजोडी प्रथम आली तर बैतुलची मिसाईल देवा या बैलजोडीने ६.५२ सेकंदात अंतर कापुन द्वितीय आणि अमरावतीच्या महाराज व काशी या बैलजोडीने सुद्धा ६.५२ वायूवेगाने अंतर कापून तृतीय विजेत्याचा बहुमान मिळविला.
क गटातुन बुलढाण्याच्या भीमा, लाडक्याने ६.४९ सेकंद वायूवेगाने अंतर कापून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला तर परतवाडा येथील काशी बाजी ने ६.४९ सेकंदात अंतर कापुन द्वितीय आणि वाढोण्याच्या लकी चिमणा ने ६.५२ सेकंदात अंतर कापून तिसरे पारितोषिक मिळविले.विजेत्या स्पर्धकांना दुचाकी व रोख रकमेचे बक्षीस आयोजकांच्या वतीने देण्यात आले व सर्व धुरकऱ्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला.
धुरकऱ्याने ७.१२ तर बच्चू यांनी ६.९ सेकंदात कापले अंतर
बच्चू कडू (Bachu Kadu) हे विदर्भाच्या मातीतील शेतकरीपुत्र आहेत. केवळ बोलण्यानेच नाही तर आपल्या कार्यातून देखील त्यांचे शेतकरीप्रेम अनेकांनी अनुभवले. आदल्या दिवशी शंकरपटात मातब्बर धूरकऱ्याने गोविंदा शिवा ही बैलजोडी हाकली तेव्हा या जोडीने ७.१२ सेकंदात अंतर कापले आणि तीच बैलजोडी बच्चू कडू यांनी हाकली तेव्हा तब्बल ६.९९ सेकंद वायुवेगाने अंतर कापुन ही बैलजोडी शर्यतीत विजेती ठरली.