देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Badlapur Case) : बदलापूर येथील आदर्श प्राथमिक शाळेत चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटत आहे. यानिमित्ताने शाळेत जाणार्या निरागस चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील शाळांची स्थिती विदारक असून जिल्हा परिषदेच्या १५०४ शाळांपैकी फक्त २० शाळांत सीसीटीव्ही लागले आहे. तर खासगीच्या नामांकित इंग्रजी अडीचशेंच्या जवळपास शाळांपैकी निवडक शाळांत सीसीटीव्ही लागले आहे. त्यामुळे सर्व (CCTV in school) शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक बुधवार, २१ ऑगस्ट रोजी चनकापूर, ता. सावनेर येथे सभापती राजकुमार कुसुंबे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर सदस्यांनी चिंता व्यक्त करण्यात आली. आरटीईच्या क्रमवारीत ६५५ शाळा आहेत. त्यातील ८० ते ९० शाळा या नामांकित इंग्रजी सीबीएसई शाळा आहेत. उर्वरित शाळा स्टेट सीबीएसईच्या आहेत. या सर्व (CCTV in school) शाळा सीसीटीव्हीच्या सुरक्षा कवचात असणे बंधनकारक आहे. मात्र तिथेच उपायांची उणीव भासते आहे. त्यावर हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला शिक्षण समिती सदस्य प्रकाश खापरे, शांता कुमरे, दिनेश ढोले, मोहन माकडे, सुनीता ठाकरे, भारती पाटील, पार्वता काळबांडे, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे उपस्थित होते.
शिक्षकदिनी होणार आणखी मंथन
काही खासगी शाळांच्या स्कूल व्हॅन चिमुकल्यांना ने-आण करण्याचे काम करतात. यातील काही (CCTV in school) शाळांच्या व्हॅन सर्व्हिलांस सिस्टीमने जोडल्या आहेत. ही चांगली बाब आहे; परंतु अनेक नामांकित शाळांच्या व्हॅन विद्यार्थ्यांना शाळा ते घरापर्यंत सोडताना ही सोय नाही. त्यावर वाहक पुरुष पाहायला मिळतात. त्या व्हॅनवर महिला वाहक किंवा सेविकांची नियुक्ती असावी, असा ठरावही करण्यात आला. तसेच ५ सप्टेंबर शिक्षक दिनी भट सभागृहात मोठा कार्यक्रम घेतला जाणार असून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना बोलावण्यात येणार असल्याची माहिती सभापती राजकुमार कुसुंबे यांनी दिली. तसेच २९ ऑगस्टपर्यंत आदर्श शिक्षकांची यादी फायनल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.