निवृत्त विंग कमांडर तथा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्रवक्त्या अनुमा आचार्य यांचा घणाघात
अमरावती (Badlapur Harassment Case) : केंद्रातील असो वा महाराष्ट्रातील सरकार असो हे अत्याचार करणाऱ्यांना बलात्कार करणाऱ्यांना संरक्षण देणारे सरकार आहे. जोपर्यंत अशा सरकारांच्या विरोधात आपण ठामपणे उभे राहत नाही आणि त्यांना जाब विचारत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही त्यामुळे अशा लोकांच्या विरोधात आपण ठामपणे एकत्र येऊन उभे राहिले पाहिजे असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या निवृत्त विंग कमांडर अनुमा आचार्य यांनी आज केले. अमरावती येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. बदलापूर येथील घटना (Badlapur Harassment Case) ही अत्यंत भीषण आणि हृदय द्रावक आहे. या घटनेमध्ये सरकारने आणि प्रशासनाने हलगर्जीपणा करून आरोपींना मदत होईल अशा प्रकारची वागणूक दिली असा आरोप आचार्य यांनी यावेळी केला.
बदलापूरच्या घटनेत (Badlapur Harassment Case) असलेली आदर्श शाळा ही भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची शाळा आहे. आपटे आणि काटकर हे दोन पदाधिकारी या शाळेच्या संचालक मंडळावर आहेत. त्यामुळेच या शाळेवर कारवाई करण्यासाठी सरकारला आणि प्रशासनाला वेळ लागला. जनतेने जेव्हा हा प्रश्न हातात घेतला तेव्हा यांना जाग आली आणि नाईलाजाने कारवाई करावी लागली. हाच जनतेचा रेटा आणि जनतेची ताकद अशा दोन्ही सरकार विरोधात आपल्याला वापरावी लागेल असेही आचार्य यावेळी म्हणाल्या. गेल्या काही काळामध्ये मणिपूर मधल्या हिंसाचारापासून ते दिल्लीत कुस्तीपटू महिलांवर झालेले अत्याचार असतील, विविध राज्यांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार असतील किंवा महाराष्ट्रात लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण असेल हे अत्यंत भीषण आहे. मात्र हे सरकार अशा बलात्कारांना आणि अत्याचार करणाऱ्यांना नेहमी संरक्षण देताना दिसते आहे यांच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्य सरकारने (Badlapur Harassment Case) अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्यासाठी शक्ती कायदा केला होता. मात्र हा कायदा सुद्धा आता राष्ट्रपतींकडे प्रलंबित असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या मध्ये तातडीने पाठपुरावा करून त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. मात्र यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप माझी महिला आणि बालविकास मंत्री तथा राज्याच्या काँग्रेसच्या नेत्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे खासदार बळवंतराव वानखडे, आमदार ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, बबलु शेखावत अध्यक्ष अमरावती शहर कॉंग्रेस, विरेंद्र जगताप, विलास इंगोले (माजी महापौर) जयश्री वानखडे अध्यक्षा महिला कॉंग्रेस, मिलींद चिमोटे, आसिफ तव्वकल, निलेश गुहे तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.