संविधान हाती घेऊन जन्माला आलेलो मी माणूस- शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर
जिजाऊ मॉसाहेबांच्या ४२७ व्या जयंतीनिमित्त मातृतीर्थात लाखो जिजाऊभक्तांची मांदियाळी
लखुजीराजेंच्या वंशजांच्याहस्ते जिजाऊंचे महापूजन
– राजेंद्र काळे
सिंदखेडराजा (Rajmata Jijau) : राजमाता जिजाऊ माँ साहेब या महाराष्ट्राची अस्मिता असून, त्यांच्याच प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मधून एका धाग्यात बांधला आहे. हाच विचार घेऊन मराठा सेवा संघाने तमाम बहुजनांना जोडण्याचे काम केले.
असे शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगून.. महाराष्ट्रात होत असलेल्या हत्या, उफाळत असलेला हिंसाचार व जाती-धर्मात निर्माण होत असलेले मतभेद.. या पृष्ठभूमीवर जिजाऊ (Rajmata Jijau) मा साहेबांच्या ४२७व्या जन्मोत्सव सोहळ्यात शिवधर्म पिठावरून बहुजन ऐक्याची हाक दिली. सध्या भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सुरू असून, माझेही हे अमृत महोत्सवी वर्ष आहे.. त्यामुळे काही लोक सोन्या-चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात, मात्र मी संविधान हातात घेऊन अशा पद्धतीने जन्माला आलो असल्याचे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे आज रविवार १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा ४२७ वा जन्मोत्सव (Rajmata Jijau) सोहळा सामाजिक उपक्रमांच्या धुमधडाक्यात व वैचारिक पद्धतीने पार पडला, त्यावेळी सायंकाळी शिवधर्मपिठावरून तमाम जिजाऊ भक्तांना संबोधित करताना शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर बोलत होते. अमृत महोत्सव निमित्त सत्कार करताना जिजाऊ सृष्टीवर १०० टक्के हमी देतो की श्वासाच्या शेवटपर्यंत आम्ही तुम्ही व्यक्त केलेल्या भावना आणि आमच्या डोक्यावर टाकलेली या पगडीची जी काही भूमिका आहे, तिच्याशी प्रामाणिक राहू आणि काम करू. तुम्हा सर्वांनी माझ्या शतक महोत्सवासाठी पुन्हा एकदा आपण येथे जमावं हीच काहींनी जिजाऊचरणी प्रार्थना केलेली आहे, त्याबद्दल मी एवढेच म्हणू शकेल की जिजाऊंनी तुमची ही सगळी प्रार्थना मान्य करावी, प्रत्यक्षात आणावी.
भारतीय संविधान आपल्या सर्वांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि संविधान तुमच्या आमच्या जगण्याचं जीवनाचं एक बहुमोल असे एक शस्त्र आहे, शास्त्र आणि सूत्र आहे. ते जोपर्यंत ठीक आहे, तोपर्यंतच आपण ठीक आहोत. मला सांगताना आनंद होतो की, भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे आणि माझे अमृतवर्ष सुरू आहे. जगाच्या पाठीवर आपल्या जिल्ह्यातही, आणि राज्यातही अनेक लोक तोंडामध्ये सोन्याचे चांदीचे चमचे घेऊन जन्माला आलेले आहेत. परंतु पुरूषोत्तम खेडेकर एकमेव असा आहे की, जो हातामध्ये संविधान घेऊन जन्माला आला आहे, असे उद्गार युगनायक तथा शिवधर्म व मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी शिवधर्मपीठावरून काढले.
स्वराज्यजननी माँ जिजाऊंच्या ४२७ व्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मातृतीर्थ सिंदखेडराजात लाखो (Rajmata Jijau) जिजाऊभक्तांची मांदियाळी जमल्याचे दिसून आले. यावेळी सर्वप्रथम जिजाऊंचे मानाचे पूजन लखुजीराजे जाधवांच्या वंशजांच्याहस्ते प्रातःसमयी करण्यात आले. त्यानंतर शिवधर्मपीठावर मुख्य सोहळा पार पडला. यावेळी युगपुरूष तथा शिवधर्माचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे उपस्थित मान्यवरांच्याहस्ते अभीष्टचिंतनही करण्यात आले.
यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, मधुकर मेहकरे, कामाजी पवार, विजय डोंगरे, मनोज आखरे, इतिहासकार गंगाधर बनबरे यांनी विचारपीठावरुन आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय डोंगरे होते तर माजी आमदार रेखाताई खेडेकर यांच्यासह ३३ कक्षांचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि उपस्थित विराट समुदाय या कार्यक्रमाला हजर होता.
याप्रसंगी शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर म्हणाले, की संविधानाच्या वर्षांमध्ये या संविधानाची संपूर्ण जी काही जबाबदारी आहे, महत्त्व आहे ते शेवटपर्यंत पोहोचवण्याची, टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. काही विस्कळीतपणा येतो येत असतो, जात असतो, त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. मराठा सेवा संघ हा काही एकट्याने मी काही केलेला अशातला काही भाग नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल सातत्याने बोललं जातं आणि महाराज सांगायचे की हे स्वराज्य निर्माण केले आहे, ते सर्वांसाठी आणि शेवटच्या क्षणापर्यंत जीवाची परवा न करता पुरुषोत्तम खेडेकर, स्वप्निल व सौरभ यांचा आणि स्नेहा नाहीतर सर्वांचाच सहभाग आहे. याचा मला अभिमान वाटतो.
तुम्ही राजकारणी आणि आम्ही समाजकारणी असे दोन गट न करता आपल्यालाच आपण कुठल्याही राजकीय पक्षात रहा, मंचावर सर्वत्रच येतात जातात, त्याच्याबद्दल आम्ही कधी आग्रह धरलेला नाही. मराठा ही व्यापक व्याख्या आहे. हा शब्द व्यापक अर्थाने वापरला व लोकांनी तो स्वीकारला. परंतु पुढच्या कालखंडामध्ये काही ना काही कारणाने चळवळीमध्ये क्षीणता आलेली आहे, शिथिलता आलेली असल्यामुळे किंवा समाजाला प्रत्येक जाती घटकाला त्याच्यामध्ये काय झाले, याचा शोधसुद्धा आपल्याला घ्यावा लागणार आहे.
सगळं कुटुंब सामाजिक कार्यामध्ये जोडलेला असताना आमच्या काही नुकसान झालेलं नाही, उलट खूप भरून सगळे मिळालेला आहे. ज्या पश्चिम महाराष्ट्राला आपण शिव्या देतो, पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्याची संपूर्ण इकॉनॉमी मराठवाडा, खानदेश आणि विदर्भाच्या पोरांच्या जीवावर आहे. सिंदखेडराजा ही मराठा म्हणजे मराठ्यांची महाराष्ट्राची काशी आहे. या काशीकडे जर आपलं दुर्लक्ष होत असेल तर लोकांना दोष देऊन काही उपयोग नाही. इथे अनेक चांगल्या बाबी आहेत, असेही याप्रसंगी पुरूषोत्तम खेडेकर यांनी सांगितले.
सेवा संघ पुरोगामी विचारांना चालना देणारा- ना. जाधव
मराठा समाजाला एकत्र आणण्याचे काम या विचारपीठाने केले आहे. मराठा सेवा संघ पुरोगामी विचाराला चालना देणारा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केले. ते पुढे म्हणाले की, सत्यशोधक चळवळीचा वारसा पंढरीनाथ पाटील यांनी चालविला, आयाजी पाटील यांनी समाजातील रुढी परंपरेला छेद देऊन कमी खर्चात आणि वेळेवर विवाह लागले पाहिजे यासाठी प्रयत्न केले. आज समाज लग्नकार्यात अनावश्यक खर्च करीत आहे. तो टाळून समाज हितासाठी त्या पैशाचा योग्य पद्धतीने वापर केला गेला पाहिजे, असे आवाहन यावेळी ना. जाधव यांनी केले. तर आ. अर्जुन खोतकर म्हणाले, की मराठा सेवा संघाने उभारलेल्या जिजाऊ सृष्टीसाठी जी काही मदत लागेल त्यासाठी आपण सहकार्य करु.
मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, की मराठा सेवा संघाचे विचार हे बहुजन समाजाला कळले पाहिजे. आज सेवा संघ ३३ कक्षामध्ये काम करीत आहे. १९९२ पासून मराठा सेवा संघाने जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचा संकल्प केला. त्याचा विस्तार संपूर्ण देशात झाला आहे. मराठा सेवा संघाच्या कार्यासाठी माझे येथे जे आहे ते मी दान करायला तयार आहे. खेडेकर साहेबांनी मला मराठा सेवा संघात काम करण्याची जबाबदारी द्यावी, मी निश्चित पार पाडेल. सिंदखेडराजा शहरात उद्योग, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, शैक्षणिक संस्था, सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे मनोगत आ. सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केले.
जिजाऊंच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरातून दिनांक ११ जानेवारीपासूनच जिजाऊभक्तांचे जत्थेच्या जत्थे मातृतीर्थात दाखल झाल्याचे चित्र दिसून आले. जिजाऊभक्तांच्या वतीने माँ जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी वारकरी दिंडी, ढोलपथक, पालखी सोहळा, सनई चौघडे आदी मंगलवाद्ये घेऊन आयोजन करण्यात आल्याचे दिवसभर दिसून आले. पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी लखुजीराजेंचे वंशज विजयसिंह राजे, विजय भगवंत राजे, आनंद राजे, प्रा.गोपाल राजे, सुभाष राजे, प्रभाकर राजे, अभि राजे, मालोजी राजे, जितेंद्र राजे यांनी जिजाऊंचे पूजन केले.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी व पूजनासाठी उपस्थित जिजाऊभक्तांच्यावतीने जिजाऊ जय शिवरायच्या घोषणेने (Rajmata Jijau) जिजाऊंचे जन्मस्थळ दुमदुमले होते. राजवाड्यातील दरबारात यंदाही किनगावराजा येथील लखुजीराजेंच्या वंशजांच्या वतीने लखुजीराजेंची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यावेळी प्रतिमेचे पूजन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. जिजाऊ जयंतीसाठी उपस्थित असलेल्या हजारो जिजाऊ भक्तानी लखुजीराजेंच्या प्रतिमेस अभिवादन केले.
यंदाच्या (Rajmata Jijau) जिजाऊ जयंतीनिमित्त राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थळाजवळ जिजाऊंच्या पाळण्याचे विशेष आयोजन करण्यात आले होते. प्रा.गोपाल राजे, आनंद राजे, सुभाष राजे, मालोजी राजे यांनी त्याचे नियोजन केले होते. जिजाऊंचे पूजन झाल्यानंतर पाळण्याचा सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये बाल जिजाऊंची मूर्ती ठेऊन सौ.अनुराधा राजे, सौ.प्रतिभा राजे, सौ.नीता राजे, सौ.प्रज्ञा राजे यांनी पाळणा गीत गायन केले.तर लहान मुलींनी पाळण्याभोवती फेर धरून नृत्य करीत जन्मोत्सव साजरा केला.